शालेय पोषण आहार, बांधकाम विभागात अनागोंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:10 AM2018-10-06T11:10:19+5:302018-10-06T11:10:22+5:30

विहिरी मंजुरीमध्ये रोहयो विस्तार अधिकाऱ्यांवर ठपका, शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराकडे शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष, बांधकाम विभागात अनागोंदी, असे प्रकार उघड करीत पंचायत राज समितीने गटविकास अधिका-यांसह सर्वच अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली.

School nutrition, chaos in the construction department! | शालेय पोषण आहार, बांधकाम विभागात अनागोंदी!

शालेय पोषण आहार, बांधकाम विभागात अनागोंदी!

पारनेर : विहिरी मंजुरीमध्ये रोहयो विस्तार अधिकाऱ्यांवर ठपका, शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराकडे शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष, बांधकाम विभागात अनागोंदी, असे प्रकार उघड करीत पंचायत राज समितीने गटविकास अधिका-यांसह सर्वच अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली. सर्वांकडून खुलासे मागवण्याचे आदेश दिले.  रोहयो विस्तार अधिका-यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली.
गटप्रमुख आमदार विरेंद्र जगताप व आमदार चरण सोनवणे, रणधीर सावरकर, राहुल मोटे या चौघांच्या समितीचे दुपारी पारनेर विश्रामगृहावर स्वागत झाले. पंचायत समिती सभापती राहुल झावरे, उपसभापती दीपक पवार, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, डॉ़ नरेंद्र मुळे उपस्थित होते. तेथेच पंचायत समिती सदस्य डॉ़ श्रीकांत पठारे यांनी दलित वस्तीचा निधी मागे जातो, विहिरींची कागदपत्रे पूर्ण होऊनही मंजुरी मिळत नाही, अशा तक्रारी केल्यावर आमदार वाघमारे, जगताप यांनी गटविकास अधिकारी तनपुरे व रोहयो विस्तार अधिकारी महादेव भोसले यांना धारेवर धरले़ भोसले यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश समितीने दिले.
‘कान्हूरपठार’ प्रकरणी कारवाई का नाही?
कान्हूरपठार ग्रामपंचायतमध्ये गैरप्रकार झाल्याचे निवेदन सखाराम ठुबे यांनी दिले होते़ यावरून समितीने गटविकास अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ या प्रकरणी ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाई का केली नाही? त्यातील दोषींना पाठीशी का घातले? असे प्रश्न करून याबाबत खुलासा करावा, असे आदेश समितीने दिले.
आश्रमशाळेची झाडाझडती
विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येणारा धान्यसाठा दोन वर्षापूर्वीचा आणि विद्यार्थ्यांच्या निवासी आश्रमशाळांच्या नोंदीत तफावत असल्याचे ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेची अनागोंदी पंचायत राज समितीच्या झाडाझडतीत उघड झाली. आश्रमशाळेतील धान्य गोदामाची समितीने तपासणी केली. गहू हा दोन वर्षांपूर्वीचा असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आली़ समितीने याची दखल घेत नवे धान्य विकायचे व जुने धान्य विद्यार्थ्यांना द्यायचे, असे उद्योग चालतात का? असा सवाल केल्यावर अधीक्षक निरुत्तर झाले़ यामधील गव्हाच्या पोत्यांवर २०१६-१७ असे लिहिले होते.

Web Title: School nutrition, chaos in the construction department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.