श्रीगोंद्यात भरते कावळ्यांची शाळा; कावळ्यांना खाद्य टाकणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 02:45 PM2019-11-17T14:45:11+5:302019-11-17T14:45:32+5:30
श्रीगोंदा शहरातील जोधपूर मारूती चौकात दररोज पहाटे कावळ्यांची शाळा भरते. येथील एका अवलिया त्यांना दररोज सकाळी खाद्य टाकतो.
बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : शहरातील जोधपूर मारूती चौकात दररोज पहाटे कावळ्यांची शाळा भरते. येथील एका अवलिया त्यांना दररोज सकाळी खाद्य टाकतो. त्यामुळे शंभर ते दीडशे कावळे चातकासारखी कधी खाऊ मिळतो याची वाटच पाहत असतात. सकाळी सहाच्या सुमारास कैलास श्रीरंग राऊत हे कधी फरसाण, बिस्किटे, तांदूळ, तर कधी गहू, ज्वारी टाकतात. त्यांनी खाद्य टाकायला सुरुवात केली की ते खाद्य खायला कावळ्यांची नुसती झुंबड उडते, असे चित्र दररोज दिसते.
कैलास राऊत यांचे वय ४५ आहे. त्यांचा दिनक्रम सुरू होतो. जोधपूर मारुती चौकात ते रोजी रोटीसाठी पान टपरीची फिरती गाडी सकाळी पाच वाजता लावतात. खराटा घेऊन आधी परिसर स्वच्छ करतात. टपरीचा माल व्यवस्थित लावायचा तोपर्यंत सहा वाजले की कावळ्यांचा एकच गलका सुरू होतो.
त्यांचा हा दिनक्रम अखंडपणे गेल्या एकोणीस वर्षांपासून सुरु आहे. आजकाल या संघर्षमयी जगात माणसाचे स्वत:कडेच दुर्लक्ष होत आहे. तर हा प्राणीप्रेमी स्वत:चे मोठे कुटुंब सांभाळून या मुक्या जीवांना रोज पोटच्या पोराप्रमाणे जीव लावत आहे. रोज मांडवगण रोडला वॉकिंगला जाणारे नागरिक हे रोज कुतूहलाने पाहत असतात. कावळ्यांबरोबरच ते चिमण्या, साळुंकी, भटक्या गायींनाही चारा खाऊ घालतात. त्यांच्यासाठी त्यांनी चौकात मोठे मातीचे भांडे ठेवले आहे. त्यात नित्यनेमाने पाणी भरून मुक्या जनावरांची तृष्णाही भागवितात.
मुलीमुळे पक्ष्यांचा छंद...
मुक्या प्राण्यांचा जिव्हाळा कसा निर्माण झाला, याबद्दल राऊत सांगतात, चौकात पूर्वी भेळीची गाडी लावायचो. छोटी मुलगी माझ्याबरोबर यायची. ती चिमण्या, कावळे दिसले की त्यांना खाद्य टाकायची. तिच्या या सवयीने पक्षी न भीता आमच्या खांद्यावर बसायचे. आता तिचे लग्न होऊन सुखाने नांदत आहे. पण तिने लावलेला पक्ष्यांचा लळा कायम राहिला. आता न चुकता दररोज त्यांची काळजी घेतो, असे त्यांनी सांगितले.