भापकरवाडी शाळेत भरते पक्षांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:02 PM2018-03-16T13:02:21+5:302018-03-16T13:03:33+5:30

भापकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांना उन्हाळ्यात अन्न, पाणी पुरवठा करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत ठिकठिकाणी पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 Schools of Bhatkarwadi filled in school | भापकरवाडी शाळेत भरते पक्षांची शाळा

भापकरवाडी शाळेत भरते पक्षांची शाळा

बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : भापकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांना उन्हाळ्यात अन्न, पाणी पुरवठा करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत ठिकठिकाणी पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भापकरवाडी शाळेत आता मुलांबरोबर पक्षांचीही शाळा भरू लागली आहे. त्यामुळे विद्यार्थी पक्षांबरोबर शाळेचा अनोखा आनंद लुटू लागले आहेत.
भापकरवाडी ही कोळगाव परिसरातील दुष्काळी पट्यातील शाळा असून ग्रामस्थांच्या मदतीने शिक्षकांनी शाळेचे रुपडेच पालटले आहे. शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे़ तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावरही विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे भापकरवाडीची शाळा फोकसमध्ये आली आहे.


शाळेत झाडांची संख्या वाढल्यामुळे शाळेमध्ये दुपारी मध्यान्ह भोजनाच्या वेळी थोड्या फार चिमण्या दिसायच्या. परंतु जसजशी उन्हाची तीव्रता वाढायला लागली व शिवारातील खाद्य संपल्यामुळे शाळेच्या परिसरात चिमण्यासोबतच कावळे, मैना, होला, डोमकावळे, कोतवाल, बुलबुल, फुलटोच्या, काळोखी, साळुंखी व इतर पक्षीही दिसायला लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पक्षी निरिक्षणाची संधी शाळेतच उपलब्ध झाली आहे. या पक्षांविषयी शिक्षकही विद्यार्थ्यांना माहिती सांगत आहेत.
पूर्वी पक्षी शाळेत मध्यान्ह भोजन योजनेतील शिल्लक राहिलेली खिचडी खाण्यास येत असत. पण त्यांना कुत्री व मांजर यांची भीती असायची. त्यात काही पक्षी जीवानिशी जात तर काही जखमी होत असत. जखमी पक्षांवर शिक्षक-विद्यार्थी उपचार करत असत. यावर विद्यार्थ्यांनी नामी युक्ती शोधली आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी पक्षांसाठी सुरक्षित जागा शोधून तेथे अन्न व खाद्य ठेवले जात आहे. त्यामुळे रोज येथे पक्षांची शाळा भरू लागली आहे. शालेय परिसरात व बागेत भरपूर वृक्षसंपदा असल्याने पक्षी तिथेच घरटी बांधू लागली आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांना पक्षांचे आवाज, रंग, आकार, त्यांच्या आवडी-निवडी यांची ओळख होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही पक्षी ओळख होत असून, पक्षांची संख्या वाढण्यास मदत होत आहे. या संकल्पासाठी शाळेतील शिक्षक बबन बनकर, कमल ठाकर व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे.

Web Title:  Schools of Bhatkarwadi filled in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.