पालकांना खुणावतेय मराठी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:44 PM2018-06-19T17:44:48+5:302018-06-19T17:45:06+5:30

जून महिना उजाडला, आता सर्वांना मुला- मुलींच्या शाळा प्रवेशाचे वेध लागले आहेत. गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे.

Schools that mark parents their parents | पालकांना खुणावतेय मराठी शाळा

पालकांना खुणावतेय मराठी शाळा

पोपट धामणे
जून महिना उजाडला, आता सर्वांना मुला- मुलींच्या शाळा प्रवेशाचे वेध लागले आहेत. गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. सदर शाळेचे शिक्षक-कर्मचारी रोज घरी येऊन मुलांचा प्रवेश घेण्याबाबत विनवण्या करताहेत . प्रवेश घ्यावा की नाही याबाबतीत पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीत कोणी तरी उत्तम सल्ला द्यावा असे पालकांना वाटते म्हणूनच हा पत्र प्रपंच...
मूल ज्या मातेच्या पोटी जन्म घेते तिची बोलण्याची जी भाषा असते ती त्या बाळाची मातृभाषा असते. गर्भावस्थेत पाचव्या महिन्यानंतर बाळाची हालचाल सुरु होते. आई एकांतात आपल्या बाळाशी खूप हितगुज करीत असते. आईचे ते प्रेमाचे बोल बाळाने आत्मसात केलेले असतात. श्रवण व अक्षर, शब्द उच्चारण कौशल्ये विकसित होईपर्यंत ते बोलू शकत नाही. जसजसे ही कौशल्ये विकसित होतात तसतसे सर्वात आधी आईच्या सूचनांचा ते स्वीकार करते आणि बोलू लागते. म्हणजेच त्याने आईची भाषा स्वीकारलेली असते. म्हणूनच मातृभाषेतून शिक्षण हा विचार मोठमोठ्या शिक्षण तज्ज्ञांनी मान्य केला आहे. आता राहिला प्रश्न इंग्रजीचा. पालकांना असे वाटते की आपल्या पाल्याला फाडफाड इंग्रजी आले पाहिजे. ज्या घरातले पालक व परिसरातले लोक हे सातत्याने इंग्रजीतून बोलतात तेथेच हे शक्य होऊ शकते. घरी आई -वडील- भाऊ -बहीण, बाहेर मित्र- मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी असे सारे मराठीतून वा मातृभाषेतून बोलतात. शाळेत गेले की मारून मुटकून प्रसंगी कठोर शिक्षा करून इच्छा नसताना इंग्रजी बोलण्याला भाग पाडले जात. ऐकावे कोणाचे अशी मुलांची अवस्था होते .
आता राहता राहिला प्रश्न मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा. इंग्रजी शाळेत शिकल्यानेच मुलाची प्रगती होते, हे साफ खोटे आहे. मुळात मुलाची प्रगती झाली की नाही याचा इंग्रजीचे अवाक्षर न समजणाऱ्या ग्रामीण भागातील पालकांना अंदाजच येत नाही. यादरम्यान त्याच्या आयुष्याची प्रगती करण्याची महत्वाची काही वर्षे वाया जातात. मातृभाषेतून शिकलेल्यांपैकी वानगी दाखल सांगायचे तर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक,लोकसभेचे पहिले सभापती गणेश मावळणकर, विधानसभेचे सभापती बाळासाहेब खेर, बनारस विश्व हिंदू विद्यापीठातून शिक्षण घेतलेले डॉ. जयंत नारळीकर, शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महा संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर अशी कितीतरी नावे सांगता येतील. हे मान्यवर मातृभाषेत शिकूनच उच्च पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे शेजारचा करतोय म्हणून मीही करतोय हा विचार सोडून द्या. शिक्षण म्हणजे केवळ दोन चार वर्षांचा खेळ.

एका मुलाला उत्तम शिक्षण द्यायचे तर त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. मुलाला इंग्रजी माध्यमातून शिकवायचे तर त्यासाठी लागणारे भरमसाठ शुल्क, हजारो रुपयांचे डोनेशन द्यायची तयारी असावी लागते. शिवाय पैसे देऊन होमवर्कच्या नावाखाली मुलांची व पालकांची होणारी दमछाक वेगळीच. हे सर्व पाहता मुलाला इयत्ता दहावीपर्यंत मातृभाषेतूनच शिकू द्यावे. नाहीतरी आता इयत्ता पहिलीपासून इंग्रजी ही तृतीय भाषा म्हणून सोबतीला आहेच. पाचवीपासून त्याला सेमी इंग्रजी माध्यम निवडता येईल. मातृभाषेबरोबरच इंग्रजीचाही अधिक अभ्यास होईल. मुलाच्या प्रगतीत अडथळाही येणार नाही. चीन, जपानसारखे अतिश्रीमंत देश आजही जागतिक संवादासाठी इंग्रजीऐवजी मातृभाषेतून बोलण्याचाच आग्रह धरतात. भारतात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, साने गुरुजी, अनुताई वाघ, गिजुभाई बधेका अशा अनेकांनी मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांच्या विचारांना हरताळ फासणाºया व शिक्षणाचा बाजार करू पाहणाºया धंदेवाईकांचे इंग्रजी शाळांचे पीक जोमात फोफावले आहे . पाल्याच्या उत्तम प्रगतीसाठी त्याला सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिकू द्या. पुढे त्याचा अध्ययन स्तर पाहून माध्यम बदलण्याचे स्वातंत्र्य त्यालाच द्या .मग पहा मुलाच्या प्रगतीचा वारू कसा वेगाने धावतो ते.

 

Web Title: Schools that mark parents their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.