श्रीरामपूर तालुक्यातील शाळा होणार डिजीटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 PM2021-03-21T16:08:42+5:302021-03-21T16:10:49+5:30
जिल्हा परिषद शाळांच्या २६८ वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा मोठा कार्यक्रम आमदार लहू कानडे यांनी मंजूर केला आहे.
श्रीरामपूर : राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या २६८ वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा मोठा कार्यक्रम आमदार लहू कानडे यांनी मंजूर केला आहे. स्थानिक विकास कार्यक्रमासाठी स्वनिधीतून दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच हाती घेतला जात आहे.
लहू कानडे यांनी येथील गटशिक्षणधिकारी यांच्याशी चर्चा करून या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित यंत्रणेकडून सर्व हार्डवेअर व्यवस्थित बसवून झाल्यानंतर सॉफ्टवेअर हाताळणीबाबत तज्ञांकडून सर्व शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे अशी सूचना त्यांनी केली.
जिल्हा परिषद शाळांमधून प्रामुख्याने शेतकरी व कष्टकऱ्यांचे मुले शिक्षण घेतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाची मोठी आबाळ झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देता यावे म्हणून वर्गांसाठी एलएफडी आणि बालभारतीने तयार केलेली ई-लर्निंग सॉफ्टवेअर मतदारसंघातील सर्व शाळांना देण्यात येत आहेत, असे आमदार कानडे यांनी सांगितले.
या सॉफ्टवेअरमध्ये पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रमातील इतर पाठ्यक्रम, सराव परीक्षा व सामान्य ज्ञानाचे धडे अशा स्वरूपाच्या सर्वांगीण अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद राहिला तरी ई-लर्निंगच्या माध्यमातून काही प्रमाणात मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेता येईल. श्रीरामपूरचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे आणि राहुरीचे गटशिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी हे या संपूर्ण प्रकल्प अंमलबजावणीवर निगराणी करणार आहेत, असे कानडे म्हणाले.
यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, विलास शेजुळ, गुलाब डोके, अमृत धुमाळ, अरुण नाईक, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब चव्हाण, विष्णुपंत खंडागळे, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब दिघे, समीन बागवान आदी उपस्थित होते.