स्कॉलेजिअन्स : वेगाची राणी दिव्यांगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:02 PM2019-03-19T13:02:46+5:302019-03-19T15:24:01+5:30
अहमदनगर ऐतिहासिक शहरात क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करून उज्ज्वल भविष्य घडविण्यास सज्ज होत असणारी वेगाची राणी दिव्यांगी कृष्णा लांडे.
संदीप घावटे
अहमदनगर ऐतिहासिक शहरात क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करून उज्ज्वल भविष्य घडविण्यास सज्ज होत असणारी वेगाची राणी दिव्यांगी कृष्णा लांडे. केडगाव येथील दिव्यांगी ही वयाची १२ वर्ष पूर्ण करत असताना ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरीचा धडाका लावला आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत क्रीडाक्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत आहे. तिच्या यशाचा हा प्रवास...
अहमदनगर येथील आयकॉन शाळेत चौथीत असताना मेजर आसाराम बनसोडे यांनी दिव्यांगीबरोबर धावण्याची स्पर्धा लावली. त्यावेळी मेजर बनसोडे यांनी तिच्यातील वेगाची पारख करून वडील कृष्णा लांडे यांना प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. तिला दिनेश भालेराव यांच्याकडे प्रशिक्षणास पाठवले. त्यानंतर तिच्यातील वेगाला दिशा मिळाली.
आता सध्या ती सहावी इयत्तेत उद्धव अकॅडमी इंग्लिश मीडियम शाळेत शिकत आहे. प्राचार्या निशिगंधा जाधव तिला सातत्याने प्रोत्साहन देतात. ती रोज संध्याकाळी वाडीया पार्क मैदानावर सराव करत आहे. कोच दिनेश भालेराव व राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या कल्याणकर यांचे मार्गदर्शन लाभते. सरावावर मेहनत घेत असताना कळंबोली येथे झालेल्या राज्य सब ज्युनिअर स्पर्धेतून दिव्यांगीचे मैदानी स्पर्धेत पदार्पण झाले. १०० मीटर धावणे स्पर्धेत सहभाग घेऊन चौथ्या स्थानावर तिला समाधान मानावे लागले. त्यानंतर नागपूर येथील राज्य स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातही १०० मीटर धावण्यात चौथ्या स्थानी राहिली. दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेत देखील निवड झाली.
गेल्या महिन्यात रोहतक (हरियाणा)येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत तिने चौदा वर्ष वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. मुलींच्या १०० मीटर रिले स्पर्धेत तिची निवड झाली. दिव्यांगीने निवड सार्थ ठरवताना सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच तिच्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला ‘चॅम्पीयनशीप’ मिळाली. नुकत्याच डेरवण (चिपळूण) येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत १२ वर्ष वयोगटात ती सहभागी झाली होती. १०० मीटर धावणे व ३०० मीटर धावणे स्पर्धेत ती सहभागी झाली होती. या दोन्ही स्पर्धेत नवा राज्य विक्रम तिने प्रस्थापित केला. १०० मीटर तिने १३.१ सेकंद वेळ घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. तसेच ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ४० सेकंद वेळ नोंदवून दुहेरी सुवर्णपदक पटकावले. दिव्यांगीचे वडील देखील उत्कृष्ट कबड्डीपटू होते. तिच्या आहाराबाबत ते दक्ष असतात. दिव्यांगी ही नगरला लाभलेली कमी वयाची उत्कृष्ट खेळाडू आहे. एका वर्षभरात ती दोन राष्ट्रीय स्पर्धा व चार राज्य स्पर्धा खेळून सुवर्णपदकांची लयलूट करत आहे. क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे,शिक्षक, आई, वडील सातत्याने तिला प्रोत्साहन देतात.
‘‘भविष्यात मला भारत देशाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धात प्रतिनिधीत्व करायचे. अहमदनगरचे नाव उज्ज्वल करायचे हे माझे स्वप्न आहे. यासाठी मला वडील तसेच मार्गदर्शक यांची मोलाची मदत मिळत आहे .’’ - दिव्यांगी लांडे -खेळाडू