पाणलोटात मुसळधार
By Admin | Published: August 2, 2016 11:59 PM2016-08-02T23:59:32+5:302016-08-03T00:16:43+5:30
राजूर/अकोले : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह अनेक गावांना अतिवृष्टीचा तडाका बसला असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे विक्रमी
राजूर/अकोले : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह अनेक गावांना अतिवृष्टीचा तडाका बसला असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे विक्रमी १९ इंचाहून अधिक पाऊस पडला. यासह गेल्या दहा वर्षांपूर्वीचे रेकॉर्डही ब्रेक झाले आहे. सोमवारी सायंकाळपासून पश्चिम पट्टयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. अतिवृष्टीच्या या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनीचे नुकसान झाले असून दिवसभरात पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरण ८५ टक्के भरले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत धरण भरण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्रगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळा नदीला मोठा पूर आला आहे तर तालुक्यातील इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत
सोमवारी सायंकाळपासून भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. रात्रभरात तर या पट्ट्यात पावसाचे तांडवच सुरु झाले आणि परिसराला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे ओढ्यानाल्यांनाही दिवसभर पूर होता. रतनवाडी खालोखाल घाटघर येथेही १२ इंच म्हणजेच २९९ मि.मी पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यातही विक्रमी वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत ८७० द.ल.घ.फू नव्याने पाणी आले. मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत १ हजार २१३ द.ल.घ.फू पाणी नव्याने आले. म्हणजे चोवीस तासांत तब्बल २ हजार ८३ द.ल.घ.फू नवीन पाणी आले आणि पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता ९ हजार ३६८ द.ल.घ.फू इतका झाला. अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे सर्व परिसर जलमय झाला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील शिखर स्वामिनी कळसूबाईच्या परिसरातही अतिवृष्टीचा तडाका बसला यामुळे प्रवरेची उपनदी कृष्णावंतीबरोबरच ओढ्यानाल्यांनाही मोठा पूर आलेला आहे. त्या बरोबरच भंडारदरा पाणलोटाच्या खालच्या पट्टयातही धुवाँधार पाऊस होत असल्यामुळे रंधा येथील धबधब्यालाही विक्राळ रूप आले आहे. यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत पाणीसाठा सुमारे ५०% च्या जवळ पोहचत तो ४ हजार ३६ द.ल.घ.फू झाला. मुळा खोऱ्यातील आजोबा पर्वताच्या परिसरातील हरिश्चंद्र पट्टयातही दिवसभर धुवाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सायंकाळी सहा वाजता लहीत येथील मुळेचा विसर्ग तब्बल ५६ हजार ७६ क्युसेक इतका झाला होता. सायंकाळी सहा वाजता मुळा धरणातील पाणीसाठा १५९४० दलघफू झाला होता.
(प्रतिनिधी)