बेवारस बालकांच्या शोधासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:05+5:302021-03-29T04:14:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : बेवारस, काळजी, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी चाइल्ड लाइनच्या वतीने ...

In search of unaccompanied children | बेवारस बालकांच्या शोधासाठी

बेवारस बालकांच्या शोधासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : बेवारस, काळजी, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी चाइल्ड लाइनच्या वतीने ‘रात्रीची गस्त’ हा उपक्रम राबविला जात असून, गेल्या वर्षभरात नगर शहर व परिसरात गस्तीदरम्यान शंभर बेवारस मुले आढळून आली. या मुलांचे शासकीय नियमाप्रमाणे पुनर्वसन करण्यात आले आहे.

चाइल्ड लाइनचे पथक शहरातील माळीवाडा, तारकपूर, पुणे बसस्थानक, रेल्वे स्टेशन, एमआयडीसी, केडगाव, नेप्ती नाका, भिंगार आदी भागांत दररोज रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत गस्त घालते.

गस्तीदरम्यान अल्पवयीन मुलगा- मुलगी एकटे आढळून आल्यास त्याच्याशी संवाद साधून तातडीने बाल कल्याण समितीशी संपर्क करून संबंधित बालकाच्या पुनर्वसनासाठी पुढील प्रक्रिया राबविली जाते. गेल्या पंधरा वर्षांपासून रात्रीच्या गस्तीचा हा उपक्रम सुरू असून, असा उपक्रम राबविणारे अहमदनगर चाइल्ड लाइन हे देशातील पहिले युनिट ठरले आहे.

..........

रोज दोघांची गस्त

दररोज रात्री ११ वाजता चाइल्ड लाइनचे दोन स्वयंसेवक नाइट पेट्रोलिंगसाठी दुचाकीवर निघतात. या स्वयंसेवकांना सार्वजनिक ठिकाणी लहान मुले एकटी बसलेली दिसली, काही व्यक्ती लहान मुलांसोबत चुकीच्या पद्धतीने वागताना दिसली, तर तातडीने हे स्वयंसेवक हस्तक्षेप करीत संबंधित मुलांना ताब्यात घेतात, तसेच पोलिसांनादेखील त्यांच्या या कामाबद्दल माहिती झाल्यामुळे रात्री लहान मुलांसंबंधी केस आली, तर तेदेखील स्वयंसेवकांना माहिती देतात. या मुलांना रात्री ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तातडीने बालगृहात दाखल केले जाते व संबंधित बालकांच्या घरच्यांचा शोध घेणे, पोलिसांकडे एफआरआय नोंदवणे या कामांना सुरुवात होते.

...........

नगरच्या चाइल्ड लाइनने २००३ ते २०२१ पर्यंत बालकांसंबंधी १४ हजारपेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढली आहेत, तसेच चाइल्ड लाइनच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून रात्रीची गस्त घालण्याचा उपक्रम राबविला जात आहे. २३ मार्च रोजी नगर शहरात ग्रुप नाइट राउंडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, सपना असावा, प्रियंका सोनवणे, बालभवनच्या प्रकल्प व्यवस्थापिका शबाना शेख, केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, टीम मेंबर शाहिद शेख, अब्दुल खान, प्रवीण कदम, राहुल कांबळे, पूजा पोपळघट, शुभांगी माने आणि स्वयंसेवक राहुल वैराळ यांनी सहभाग घेतला होता.

-प्रवीण कदम,

रात्र विभागप्रमुख, चाइल्ड लाइन

Web Title: In search of unaccompanied children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.