संगमनेर नगरपरिषदेने संस्थांना दिलेल्या जागांची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:19 AM2021-03-25T04:19:49+5:302021-03-25T04:19:49+5:30
संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेने आपल्या स्वमालकीच्या व इतर प्रॉपर्टी रेकॉर्डवरील जमिनी ज्या शैक्षणिक संस्था, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व ...
संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेने आपल्या स्वमालकीच्या व इतर प्रॉपर्टी रेकॉर्डवरील जमिनी ज्या शैक्षणिक संस्था, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व इतर धार्मिक संस्थांना दिल्या आहेत. त्या जमिनींचा, इमारतींचा वापर त्याच कारणासाठी होत आहे, अथवा नाही. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने करण्यात आली.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांना बुधवारी (दि. २४) याबाबत निवेदन देण्यात आले. नगर परिषदेने शहरातील विविध शैक्षणिक संस्था, प्रतिष्ठान यांना आपल्या मालकीच्या जागा कौन्सिल ठरावाद्वारे कायमस्वरूपी दिलेल्या आहेत. मैदान, शाळा उभारणीसाठी या जागा दिल्या आहेत. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने जागा देण्यात आल्या. परंतु नगरपरिषदेने दिलेल्या मोक्याच्या जागा त्याच प्रयोजनासाठी वापरल्या जात आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या जागांमधील संस्थांमध्ये शहरातील सर्वच जाती, धर्मांतील वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या मुलांना प्रवेश आहे का? हे देखील पहावे . शहरातील श्रमिकनगर येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करावे. यासाठी संस्था नगरपरिषदेकडे पाठपुरावा करत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. त्यावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असिफ शेख यांची सही आहे.