कोरोनाबाधित रूग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह; बाधितांची प्रकृती उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:10 PM2020-03-21T12:10:34+5:302020-03-21T12:11:31+5:30
सर्वप्रथम कोरोनाबाधीत झालेल्या ज्या रूग्णामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. त्या रूग्णाबाबत आता दिलासादायक बातमी आली आहे. सात दिवसांनंतर त्या रूग्णाचा ‘एनआयव्ही’कडे पाठविलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तोही निगेटिव्ह आला तर हा रूग्ण कोरोनामुक्त होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
अहमदनगर : सर्वप्रथम कोरोनाबाधीत झालेल्या ज्या रूग्णामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. त्या रूग्णाबाबत आता दिलासादायक बातमी आली आहे. सात दिवसांनंतर त्या रूग्णाचा ‘एनआयव्ही’कडे पाठविलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तोही निगेटिव्ह आला तर हा रूग्ण कोरोनामुक्त होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
दरम्यान, पुण्याला तपासणीसाठी पाठवलेल्या कोरोना संशयितांच्या स्त्रावाचे २५ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील १५५ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्या सर्वांना त्यांच्या घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. तर ७८ जणांचे अहवाल येणे बाकी असून त्यांना जिल्हा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचे आवाहन
आरोग्य सुविधांसाठी आणि खासकरुन व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून खर्च करण्यास मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडावी. कोणत्याही परिस्थितीत हे संकट आणखी वाढणार नाही, याची काळजी प्रत्येक जिल्हावासियांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशासनाला सहकार्य करा: थोरात
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळा, गर्दीत बाहेर जाणे टाळा. परदेशातून कोणी व्यक्ती परत आला असेल तर त्याची माहिती जिल्हा यंत्रणेला द्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी नगर शहरात प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते.