पाथर्डीकरांनी दुस-यांदा राजळेंना तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 04:09 PM2019-10-25T16:09:07+5:302019-10-25T16:09:48+5:30
अत्यंत चुरशीच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजळे यांना सलग दुस-यांदा मतदारांनी कौल देत विधानसभेत पाठविले आहे़. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना शेवगाव तालुक्यात आघाडी मिळाली होती़. मात्र, ही आघाडी मोडून काढीत पाथर्डीकरांनी राजळेंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले़. राजळेंच्या विजयामुळे मतदारांनी जातीय समीकरणेही ठोकरल्याचे दिसत आहे़.
शेवगाव विधानसभा विश्लेषण-उमेश कुलकर्णी / अनिल साठे ।
पाथर्डी : अत्यंत चुरशीच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजळे यांना सलग दुस-यांदा मतदारांनी कौल देत विधानसभेत पाठविले आहे़. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना शेवगाव तालुक्यात आघाडी मिळाली होती़. मात्र, ही आघाडी मोडून काढीत पाथर्डीकरांनी राजळेंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले़. राजळेंच्या विजयामुळे मतदारांनी जातीय समीकरणेही ठोकरल्याचे दिसत आहे़.
मतदारसंघात केलेली विकास कामे, मतदारांशी असलेला थेट संपर्क आणि पाथर्डीकरांनी दिलेली निर्णायक साथ राजळेंच्या विजयाची त्रिसूत्री मानली जाते़. ढाकणे यांना माजी आमदार घुले बंधूंची साथ मिळाली असली तरी त्यांना पाथर्डी तालुक्यातूनच म्हणावी तितकी साथ मिळाली नाही़. शेवगावमधून मिळालेली आघाडी त्यांना पाथर्डी तालुक्यात टिकविता आली नाही़. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शेवगाव तहसील कार्यालयात घेण्यात आली. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या अकरा फेरीत राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना आघाडी होती. परंतु अकराव्या फेरीनंतर राजळे यांनी आघाडी घेतली़ ती आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली़. त्यांनी १४ हजार २९४ मतांनी विजय संपादन केला.
ढाकणे यांच्याविषयी काही प्रमाणात सहानुभूती निर्माण झाल्याचे बोलले जात होते़. परंतु ढाकणेंना मिळालेली सहानुभूती मतांमध्ये परावर्तित झालेली निकालातून दिसत नाही़. बोधेगाव येथे ढाकणेंचा केदारेश्वर सहकारी साखर कारखाना आहे़. परंतु त्या भागातही ढाकणेंना अपेक्षित मुसंडी मारता आली नाही़. तसेच पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातही ढाकणेंना आघाडी घेता न आल्याने त्यांचा पराभव झाल्याचे दिसत आहे.
राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे यांची झालेली सभा फायद्याची ठरली़. राजळे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज होती़. त्या तुलनेत ढाकणे यांच्याकडे कार्यकर्ते फारच कमी होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोधेगावात तर खासदार अमोल कोल्हे यांनी पाथर्डी येथे ढाकणे यांच्यासाठी सभा घेतली.
या सभांमुळे ढाकणे यांच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली़. मागील निवडणुकीत राजळे यांना ५३ हजारांचे मताधिक्य होते़. मात्र, राष्ट्रवादीच्या झुंजार प्रचाराने राजळेंच्या मताधिक्याचा वारु १४ हजारावर रोखला़. मतमोजणीत राजळे सुरुवातीला पिछाडीवर असल्याने त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. मात्र पाथर्डीने त्यांना तारले.
ढाकणे, राजळेंचे संपूर्ण कुटुंब होते प्रचारात
मोनिका राजळे यांच्या प्रचारात पक्षाचे जुने कार्यकर्ते फारसे सहभागी झाले नव्हते. राजळे यांच्या प्रचारात त्यांचा मुलगा कृष्णा, दीर राहुल राजळे , जाऊबाई मोनाली राजळे सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारात ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे, प्रताप ढाकणे यांच्या सौभाग्यवती प्रभावती ढाकणे, मुलगा ऋषिकेश ढाकणे सहभागी झाले होते़.
राजळेंनी गुलाल घेतलाच नाही
परळी येथील निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्याने मोनिका राजळे यांनी स्वत:च्या विजयानंतर विजयाचा आनंद साजरा केला नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोनिका राजळे यांना मानस कन्या मानले होते. त्या नात्याने बहीण पंकजा यांचा पराभव झाल्याने राजळे नाराज होत्या. मागील वेळेप्रमाणे विजयी सभा घेणे टाळले. मात्र शेवगाव व पाथर्डीतील कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला.