सव्वाशे वृद्धांनी कोरोनाची दुसरी लाट थोपवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:18+5:302021-04-30T04:26:18+5:30
शिर्डी : कोरोनाची दुसरी लाट घराघरात पोहचली असताना येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील सव्वाशे वृद्धांनी मात्र परमेश्वरावरील श्रद्धा, जगण्याची उमेद व ...
शिर्डी : कोरोनाची दुसरी लाट घराघरात पोहचली असताना येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील सव्वाशे वृद्धांनी मात्र परमेश्वरावरील श्रद्धा, जगण्याची उमेद व कोराना संदर्भातील घेतलेल्या काळजीने कोरोनाला आश्रमाच्या दरवाजातच रोखले आहे.
शिर्डीपासून अडीच किमी अंतरावर द्वारकामाई वृद्धाश्रम आहे.
श्रीनिवास रेड्डी व सुधा रेड्डी हे सेवाभावी दाम्पत्य दात्यांच्या मदतीतून हा आश्रम चालवते. निराधार व गरजू वृद्धांसाठी उभारलेल्या निवाऱ्यात ६० वर्षांपासून ९४ वर्षांपर्यंतचे ११७ वृद्ध आहेत. यात ७७ महिला व ५० पुरुष आहेत.
मागील वर्षी एका बेसावध क्षणी कोरोनाने आश्रमात प्रवेश केला. यावेळी श्रीनिवास रेड्डी रुग्णालयात अॅडमिट होते. सुधा रेड्डी आपल्या २५ कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सचिन तांबे यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जिवाची बाजी लावून मदतीला उभे राहिले. संवेदनशील असलेले प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के व डॉ. संजय गायकवाड तत्परतेने मदतीला धावले. डॉ. गायकवाड यांनी आपल्या टिमसह अविश्रांत मेहनत घेऊन सगळ्यांची टेस्ट केली. मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्यांना तातडीने संस्थानच्या कोविड रुग्णालयात दाखल केले. एकूण ३७ वृद्धांना बाधा झाली. त्यातील आजार व वृद्धत्वाने जर्जर झालेल्या तिघांना कोरोना घेऊन गेला.
डॉ. संजय गायकवाड यांच्या पथकाने ८९ वृद्धांना आश्रमात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला. आधारकार्ड नसल्याने उर्वरित ३८ वृद्धांना लस देता आली नसली तरीही त्यांच्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
वृद्धांची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मशक्ती जागृत करण्यासाठी अध्यात्म व श्रद्धेचाही उपयोग होत असल्याचे द्वारकामाईचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.
............