कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा अधिका-यानेच केला ‘त्या’ प्राध्यापकावर हल्ला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:08 PM2020-07-22T17:08:17+5:302020-07-22T17:09:04+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रा. डॉ. राहुल देसले यांच्यावर चार दिवसापूर्वी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारीच निघाला आहे. पोलिसांनी या सुरक्षा अधिका-यास बुधवारी (२२ जुलै) अटक केली.
राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रा. डॉ. राहुल देसले यांच्यावर चार दिवसापूर्वी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारीच निघाला आहे. पोलिसांनी या सुरक्षा अधिका-यास बुधवारी (२२ जुलै) अटक केली.
गोरक्षनाथ शेटे असे या सहायक सुरक्षा अधिका-याचे नाव आहे. चार दिवसापूर्वी डॉ. देसले हे विद्यापीठाच्या आवारातून फिरायला जात असताना एका कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत डॉ. देसले यांनी पोलिसात तक्रार दिली होती. याबाबत श्रीरामपूरच्या विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी हल्लेखोरांचा शोध घेतला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहायक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या सांगण्यावरून देसले यांच्यावर हल्ला केल्याचे भास्कर उर्फ माणिक नानासाहेब काचोळे, तोपिक जमील देशमुख , परवेज सय्यद या आरोपींनी सांगितले. घटना घडल्यापासून शेटे हाही फरार झाला होता. त्यास बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाने शेटे याचे सहाय्यक सुरक्षापद काढून घेतले आहे. मागील किरकोळ वादातून शेटे याने देसले यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे.