उमेदवारीसाठी सेनेत रस्सीखेच
By Admin | Published: October 27, 2016 12:33 AM2016-10-27T00:33:48+5:302016-10-27T00:51:46+5:30
विनोद गोळे , पारनेर नव्याने अस्तिवात आलेल्या सुपा जिल्हा परिषद गटाला वाडेगव्हाण जोडल्याने जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने
विनोद गोळे , पारनेर
नव्याने अस्तिवात आलेल्या सुपा जिल्हा परिषद गटाला वाडेगव्हाण जोडल्याने जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीसाठी रस्सीचेच होणार आहे. तर राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या दुसऱ्या गटाला जागा सोडणार आहे. भाजपाही रिंंगणात उतरणार आहे. काँग्रेसचा निर्णय कुणाशी युती करणार यानंतर होणार आहे.
पारनेर-सुपा असलेला जिल्हा परिषद गट आता नव्याने सुपा-वाडेगव्हाण झाला आहे. यामुळे वाडेगव्हाण गणावर सेनेची मोठी भिस्त राहणार आहे.
सुपा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने आता सेनेमध्ये पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या सौभाग्यवती सुषमा, नारायणगव्हाणचे सरपंच सुरेश बोऱ्हुडे यांच्या सौभाग्यवती मीनाक्षी व मुंगशीचे सुनील थोरात यांची सौभाग्यवती निर्मला इच्छुक आहेत. सुषमा गणेश शेळके यांनी गावोगावी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गणेश शेळके सभापती असल्याने सुपा गटात त्यांनी दौरे वाढविले आहेत. सुपा गणातून सेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांना उमेदवारी दिल्यावर शेळके यांना बळ मिळेलच, शिवाय वाडेगव्हाण हा हक्काच्या गणाचा फायदा होईल, असे गणित शेळके यांचे कार्यकर्ते मांडीत आहेत. निर्मला सुनील थोरात यांनी आपलाच उमेदवारीवर हक्क असल्याचे सेनेकडे सांगत आहेत. आता थांबायचे नाही, लढायचे असा संदेशही त्यांनी सेनेला दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची काँग्रेसच्या दुसऱ्या गटाशी युती होणार आहे. त्यांना सुपा गटाची जागा देण्यात येणार असून तेथे काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचे युवा नेतृत्व राहुल शिंदे यांच्या मातु:श्री वैशाली अण्णा पाटील शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मृत्युंजय प्रतिष्ठानचे प्रमुख नितीन शेळके यांनी गटातील प्रत्येक गावात शाखा उघडून युवकांचा मोठा समूह हाताशी धरून बस्तान बसवले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद मिळवतानाच आपल्या सौभाग्यवती सुषमा शेळके यांच्यासाठी भाजपाची उमेदवारीही त्यांनी निश्चित केली आहे.