शिर्डीत आसामच्या भक्ताला गुन्हेगारी अन माणुसकीचेही दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:53 PM2018-08-29T16:53:26+5:302018-08-29T16:53:54+5:30
साईदर्शनासाठी आसाम येथून आलेल्या साईभक्तास शहरातील वाढत्या गुन्हेगारी बरोबरच माणुसकीचेही दर्शन घडले. शंतनु विपूल हजारिका, जि.जोहार, आसाम हे ११ आॅगस्ट रोजी शिर्डीत साईदर्शनाला आले होते. साईसंस्थानच्या भक्तनिवासात त्यांनी निवास केला.
शिर्डी : साईदर्शनासाठी आसाम येथून आलेल्या साईभक्तास शहरातील वाढत्या गुन्हेगारी बरोबरच माणुसकीचेही दर्शन घडले.
शंतनु विपूल हजारिका, जि.जोहार, आसाम हे ११ आॅगस्ट रोजी शिर्डीत साईदर्शनाला आले होते. साईसंस्थानच्या भक्तनिवासात त्यांनी निवास केला. याठिकाणी त्यांची बॅग व पैसे चोरीला गेले. संस्थानच्या काही कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला तर काहींनी तक्रार देऊन फायदा होणार नाही असे सांगितले. द्विधा मनस्थिती निर्माण झालेले हजारिका हताश झाले. त्यांनी अनेकांकडे मदतीची याचना केली. मात्र त्यांना फारसी मदत झाली नाही. शेवटी त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांची प्रकृती बिघडली. १८ आॅगष्ट रोजी रक्तदाब व शुगर अचानक वाढल्याने चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी चार-पाच दिवसाच्या उपचारानंतर त्यास बरे वाटले. त्यांनी सर्व घडलेली हकीगत सांगितली. मला घरी जाण्यासाठी मदत करा, अशी विनवणी त्यांनी केली़ येथील सामाजिक कार्यकर्ते द्वारकामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ताराचंद कोते तसेच सागर कोते, ऋषीकेश कोते यांच्यासह रुग्णालयातील वार्ड बॉय, परिचारिका यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी हताश झालेल्या भक्तास मदतीचा हात दिला. या भक्ताच्या कुटुंबियाशी संपर्क साधून घरी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट तसेच खर्चासाठी पैसे दिले.