कान्हूर पठारमध्ये उभी राहणार बियाणे बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:11+5:302021-04-12T04:19:11+5:30
पारनेर : शेतात, वनात असणाऱ्या झाडे, वनस्पतीचे संकलन करून कान्हूर पठार येथे बियाणे बँक बनविण्याचा उपक्रम आडवाटेचं पारनेर टीमच्या ...
पारनेर : शेतात, वनात असणाऱ्या झाडे, वनस्पतीचे संकलन करून कान्हूर पठार येथे बियाणे बँक बनविण्याचा उपक्रम आडवाटेचं पारनेर टीमच्या युवकांनी केला आहे. यातून सुमारे १० हजार बियाणे संकलनचे नियोजन केले आहे.
पारनेर तालुक्यातील आडवाटेचं पारनेर या टीममधील युवक सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
प्रा. तुषार ठुबे, माजी सैनिक हरी व्यवहारे, सचिन गायखे, प्रमोद चेमटे, संकेत ठाणगे यांच्यासह अनेक युवकांनी एकत्र येऊन बियाणे बँक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सध्या लॉकडाऊन काळात घरी असणारे शाळकरी मुले, मुलीपासून युवकांना या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
वेगवेगळ्या फळझाडे, दुर्मीळ वनस्पती किंवा डोंगरावर पडणाऱ्या बिया, फळे खाल्ल्यानंतर राहणाऱ्या बिया जमा करण्याचे काम करणार आहेत. बियाणे साठवणूक करून त्यांची काही रोपे तयार करण्यात येणार आहेत, असे प्रा. तुषार ठुबे यांनी सांगितले.
............
गड किल्ल्यावर करणार बीजारोपण
प्रा. तुषार ठुबे, प्रमोद खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करीत आहेत. आता विविध प्रकारच्या फळझाडे, वनस्पती यांच्या बिया गोळा करून त्याचे बीजारोपण गडकिल्ल्यावर करण्याचे नियोजन आहे. हा एक चांगला उपक्रम सामाजिक ध्येय म्हणून करीत आहोत.
- हरी व्यवहारे, माजी सैनिक, कान्हूर पठार
...........
कोट
आडवाटेचं पारनेर टीम बियाणे बँक बनवत आहे. हा खूप निसर्ग संवर्धन करणारा उपक्रम आहे. यामुळे तरुणांना वृक्षाचे महत्त्व समजेल. बियाणे कोणते आहेत याचीसुद्धा ओळख होईल. युवकांनी असे सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक