चोंडी येथे होणार २०० एकरांत बीजोत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:23+5:302021-06-16T04:29:23+5:30

जामखेड : कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कडून यंदाच्या खरीप हंगामात जामखेड ...

Seed production will be done on 200 acres at Chondi | चोंडी येथे होणार २०० एकरांत बीजोत्पादन

चोंडी येथे होणार २०० एकरांत बीजोत्पादन

जामखेड : कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कडून यंदाच्या खरीप हंगामात जामखेड तालुक्यातील चोंडी येथे २०० आणि कर्जत तालुक्यातील पाटेगाव ५० एकरांत उडदाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

मतदारसंघातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बियाणांची गरज आपल्याच तालुक्यातून भागावी, हा उद्देश समोर ठेवून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना उडीद बियाणांची होणारी कमतरता लक्षात घेऊन आ. रोहित पवार बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांची पीक वाणाची मागणी, शेतकऱ्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग, महामंडळाची संबंधित भागात बियाणे साठवणूक व प्रक्रिया क्षमता आणि बीजोत्पादनासाठी नैसर्गिक परिस्थिती आदी बाबींचा विचार करून हा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो.

बीजोत्पादनासाठी कर्जत तालुक्यातील पाटेगाव, तर जामखेड येथील चौंडी या ठिकाणी हे प्लॉट उपलब्ध करण्यात येणार आहेत. बीजोत्पादित करण्यात येणारे बियाणे हे शंभर टक्के खरेदी करण्याची हमी महामंडळाने घेतलेली आहे. मात्र, हे बियाणे धान्य म्हणून कोणत्याही व्यापाऱ्याला विकता येणार नाही. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सरासरी उडीद बाजारभावावर २० टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कर्जत व जामखेडच्या एकूण २५० एकर क्षेत्रातून सरासरी ५ क्विंटल प्रति एकरप्रमाणे १२५० क्विंटल एवढ्या बियाणाचे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.

जामखेड तालुक्याला साधारणत: २००० क्विंटल सरासरी महाबीज बियाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ५० टक्के बियाणांची गरज आता तालुक्यातूनच भागणार आहे. सध्या चौंडी (ता. जामखेड) येथे सुमारे १५० एकरांची बुकिंग पूर्ण झालेली आहे. तर कर्जतच्या पाटेगावमधूनही ५० एकरांची बुकिंग पूर्ण झालेली आहे. एकंदरीत दरवर्षी शेतकऱ्यांची बियाणांसाठी होणारी ससेहोलपट कायमची थांबणार आहे.

...........

गतवर्षी उडदाच्या बियाणांची मोठी कमतरता होती. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य व परराज्यातील कंपन्यांशी संपर्क साधून बियाणे उपलब्ध केले. मात्र, यापुढे अशी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपणच आपले बियाणे निर्माण करावे, असे वाटले. आता अर्ध्याहून जास्त बियाणांची गरज आपल्या तालुक्यातूनच भागणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

-रोहित पवार, आमदार

..............

असा असेल बीजोत्पादनाचा फायदा

साधारणपणे बाजारात उडदाचा बाजारभाव ६ हजार रुपये प्रति क्विंटल आहे, तर बाजार भावावर २० टक्क्यानुसार म्हणजेच १२०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मिळणार आहेत. त्याशिवाय महाबीजकडून प्रति क्विंटल देण्यात येणारा बोनस ५०० रुपये, बियाणाला मिळणारे शासकीय अनुदान प्रति क्विंटल ५०० रुपये असणार आहे. म्हणजेच महाबीजच्या बाजारभावाची रक्कम ८२०० रुपयांपर्यंत जाते. गेल्यावर्षीचा बीजोत्पादन दर ८५०० ते ८९०० प्रति क्विंटल एवढा होता.

Web Title: Seed production will be done on 200 acres at Chondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.