बियाणे आणले लाल कांद्याचे, मात्र पिकला पांढरा कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 PM2021-03-24T16:11:39+5:302021-03-24T16:16:02+5:30
देवळाली प्रवरा परिसरातील अनेक शेतक-यांची कांद्याच्या बियाणात फसवणूक झाली आहे. एका कंपनीचे बियाणे राहुरी येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते.
राहुरी : देवळाली प्रवरा परिसरातील अनेक शेतक-यांची कांद्याच्या बियाणात फसवणूक झाली आहे. एका कंपनीचे बियाणे राहुरी येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते. हे बियाणे लाल कांद्याऐवजी पांढ-या कांद्याचे निघाले आहे. यामुळे अनेक शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
देवळाली प्रवरा येथील नितीन बबन खांदे, रोहित विठ्ठल शेटे या शेतक-यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्रातून २ ऑक्टोबर २०२० रोजी ३५ हजार रुपयांचे लाईट रेड कंपनीने लाल कांद्याचे गावरान बियाणे खरेदी केले होते. शेतात कांदा जसजसा मोठा होऊ लागला. तसतसा तो पांढरा आढळून येऊ लागला. यानंतर बियाणात फसवणूक झाल्याचे शेतक-यांच्या निदर्शनास आले. यानंतर तातडीने कृषी सेवा केंद्राशी संपर्क केला. त्यांनी कांदा बियाणे कंपनीशी संपर्क साधला असता पांढरा कांदा ऐवजी लाल कांदा देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पुन्हा कंपनीने शेतक-यांना प्रतिसाद दिला नाही. यानंतर शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
.....
कांदा बियाणात आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही राहुरी येथील उंडे कृषी सेवा केंद्र चालकांशी संपर्क साधला होता. त्यावेळी उंडे यांनी लाईट रेड कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क केला. यावेळी तुम्हाला पांढ-या कांद्याच्या बदल्यात लाल कांदा देऊ, असे कंपनीने सांगितले होते. पण नंतर परत कंपनीवाल्यांनी आमचे फोन उचलले नाहीत. त्या कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी.
-नितीन खांदे, शेतकरी, देवळाली प्रवरा.
......
पांढरा कांदा निघाल्यानंतर आम्ही कंपनीशी बोललो होतो. काढणीच्या वेळी पांढ-या कांद्याऐवजी लाल कांदा देण्याचे ठरले होते. अजून खूप दिवस बाकी आहेत. शेतक-यांनी संयम धरावा.
-ज्ञानेश्वर उंडे, कृषी सेवा केंद्र चालक, राहुरी.
......
कांदा बियाणात फसवणूक झाल्याच्या तालुक्यातून वळण, देवळाली प्रवरा, टाकळीमियाॅ या गावातील शेतक-यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तालुका तक्रार निवारण समिती त्याठिकाणी भेट देऊन त्या बियाणांसंदर्भात सर्व माहिती गोळा करणार आहे. त्यानंतर योग्य तो अहवाल पाठविला जाईल.
-महेंद्र ठोकळे, तालुका कृषी अधिकारी, राहुरी.