माध्यमिक शाळेत स्वयंरोजगाराचे धडे
By Admin | Published: May 14, 2014 11:34 PM2014-05-14T23:34:12+5:302023-10-27T16:31:39+5:30
अहमदनगर: व्यवसायात रस आहे़ पण योग्य मार्गदर्शन नाही़ त्यामुळे विद्यार्थी मागे राहतात, असे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत नेहमीच बोलले जाते़
अहमदनगर: व्यवसायात रस आहे़ पण योग्य मार्गदर्शन नाही़ त्यामुळे विद्यार्थी मागे राहतात, असे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत नेहमीच बोलले जाते़ मात्र आता शाळेतच विद्यार्थ्यांना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन मिळणार असून, प्रत्येक माध्यमिक शाळेत व्यवसाय मार्गदर्शन केंद्र येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही व्यवसायात आपला ठसा उमठवू शकतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे़ व्यवसायात उडी घेऊन कर्तृत्व दाखविण्याची अनेकांना इच्छा असते़ परंतु विद्यार्थ्यांची व्यवयासाविषयीची पाटी कोरी असते़ व्यवसाय करण्याची इच्छा आहे़ पण पुरेशी माहिती नाही़ व्यवसाय करायचा म्हटलं तर माहिती कुठे मिळेल, इथपासून सुरुवात होते़ त्यामुळे व्यवसायाकडे फारसे कुणी वळताना दिसत नाही़त्यात कुणी धाडस दाखविलेच तर त्यासाठी भांडवल आणणार कुठून, प्रशिक्षण कुठे मिळेल, त्यासाठी शुल्क किती असेल, यासारख्या प्रश्नांची लांबच लांब यादी तयार होते़ या प्रश्नांची उकल व्हावी व व्यवसायाची सर्व माहिती शाळेतच मिळेल, यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शाळेत व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे़ प्रत्येक शाळेत एका शिक्षकाची समुपदेशक म्हणून नियुक्तीही केली आहे़ नगर जिल्ह्यातील ६५० माध्यमिक शाळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे़ विद्यार्थ्यांना येत्या जूनपासून स्वयंरोजगारासह इतर उद्योग विश्वाची माहिती शाळेतच उपलब्ध होणार आहे़ सर्व शिक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ जिल्ह्यातील ६५० माध्यमिक शाळेतील एका शिक्षकास नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले़ समुपदेशक म्हणून हे शिक्षक काम करतील़ त्यांना पाच दिवसांच्या प्रशिक्षणात याविषयीची माहिती देण्यात आली आहे़ ही माहिती समुपदेशक विद्यार्थ्यांसह परिसरातील युवकांना देतील़ इयत्ता दहावी व बारावीत उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांना व्यवसायाची माहिती दिली जाणार आहे़ जेणे करून या विद्यार्थ्यांना व्यवसाय करणे शक्य होईल़ व्यवसाय करायचे झाल्यास शासनाच्या काय योजना आहेत, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, यासारखी माहिती विद्यार्थ्यांसह परिसरातील युवकांना दिली जाणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही व्यवसाय करता येईल. विद्यार्थ्यांना व्यवसायाची माहिती मिळावी, यासाठी राष्ट्रीय शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक माध्यमिक शाळेत व्यवसाय केंद्र सुरू करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील अनुदानीत शाळेत हा उपक्रम राबविला जात असून,प्रत्येक शिक्षकाला याविषयी नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे़ प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकाची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ हे समुपदेशक विद्यार्थ्यांसह परिसरातील युवकांना याविषयी माहिती देतील़ - आऱ एम़ पवार, विस्तार अधिकारी, माध्यमिक विभाग