केडगावचे स्मशान बनले सेल्फी पॉइंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:29 PM2018-06-04T12:29:18+5:302018-06-04T12:30:02+5:30
स्मशानाचे नाव काढले तरी अनेकांचा भीतीने थरकाप सुटतो. स्मशानासमोरून जाण्याचीही हिंमत होत नाही. पण हेच स्मशान फोटोसेशन करण्यासाठी अनेक हौशींचे मुख्य आकर्षण ठरत आहे. केडगावमधील शांतिवन सध्या अशा हौशी फोटो काढून घेणाऱ्यांचे सेल्फी पॉइंट बनले आहे. सेल्फीचे वेड थेट आता स्मशानातच जाऊन पोहोचले आहे.
योगेश गुंड।
केडगाव : स्मशानाचे नाव काढले तरी अनेकांचा भीतीने थरकाप सुटतो. स्मशानासमोरून जाण्याचीही हिंमत होत नाही. पण हेच स्मशान फोटोसेशन करण्यासाठी अनेक हौशींचे मुख्य आकर्षण ठरत आहे. केडगावमधील शांतिवन सध्या अशा हौशी फोटो काढून घेणाऱ्यांचे सेल्फी पॉइंट बनले आहे. सेल्फीचे वेड थेट आता स्मशानातच जाऊन पोहोचले आहे.
तरुणांना भुरळ घालणारे आणि आवडणारे अनेक सेल्फी पॉइंट नगर परिसरात उपलब्ध आहेत. शहराभोवतालच्या ऐतिहासिक वास्तू यासाठी मुख्य आकर्षण ठरल्या. चांदबिबी महल, भुईकोट किल्ला परिसर हे तरुणांना आवडणारे सेल्फी पॉइंट आहेत. मात्र त्याच त्याच ठिकाणच्या फोटोसेशनचा तरुणांना कंटाळा आलेला दिसतो. यामुळेच अनेक तरुणांनी सेल्फीसाठी आपला मोर्चा आता केडगावमधील शांतीवनाकडे वळवला आहे. या शांतीवनातील गर्द हिरवी झाडी,चोहोबाजूंनी पसरलेली हिरवळ, हिरवी पाने, फुले, बसण्याचे ओटे या सर्व गोष्टी आता फोटोसेशनसाठी उपयोगात येऊ लागल्या आहे. काही ठिकाणी अमरधाम म्हणजे लोकांना नकोसे असलेले ठिकाण कारण तेथे बसण्यासाठी ठीक जागाही नसते. नाविलाजास्तव लोक अशा ठिकाणी बसून राहतात. अनेक गावांच्या स्मशानाची दुरवस्था पाहून मरणही वेदनादायी ठरावे अशी प्रतिक्रिया उमटली जाते. मात्र केडगावमधील शांतीवन याला अपवाद ठरावे.
ग्रामपंचायत काळापासून या शांतीवनाची उभारणी करण्यात आली. मध्यंतरी त्याचे सुशोभिकरण करण्यात आले. शांतीवन नावाला शोभेल अशी शांतता आणि स्वच्छता हे येथील मुख्य वैशिष्ट्य आहे. येथील हिरवळ तर अनेकांना भुरळ घालते. यामुळेच सध्या कडाक्याच्या उन्हात शांत आणि थंड सावली असणाºया या शांतीवनात फोटोसेशन आणि सेल्फी काढून घेणाºयांची मोठी गर्दी होत आहे. त्यात तरुणांची गर्दी अफाट असते. येथे फोटो काढून घेण्यासाठी खास छायाचित्रकार बोलवण्यात येतात. हव्या त्या पोझ मध्ये फोटो काढून घेण्यासाठी सर्वांची चढाओढ लागलेली असते. सेल्फीच्या वेडापायी हे स्मशान सेल्फी पॉइंट बनले आहे.