खराब मोबाईलची विक्री; कंपनीला दणका, ग्राहक मंचाचा निकाल
By शिवाजी पवार | Published: June 14, 2023 01:26 PM2023-06-14T13:26:20+5:302023-06-14T13:27:21+5:30
ग्राहकाला ३० हजार रुपये देण्याचे आदेश
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील अमित अभय मुथ्था यांना खराब मोबाइलची विक्री केल्याप्रकरणी कंपनीला ३० हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.
मुथ्था यांना मोबाइल किमतीचे पैसे तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळणार आहे. तक्रारदार मुथ्था यांनी २०१७ मध्ये एका कंपनीचा मोबाइल शहरातील एका विक्रेत्याकडून खरेदी केला होता. मात्र, मोबाइलमध्ये अनेक तांत्रिक समस्या सुरू झाल्या. मोबाइलमधील सीम कार्डला नेटवर्क मिळत नव्हते. तसेच मोबाइल गरम होत होता. विक्रेत्याकडे चौकशी केल्यानंतर तो दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला. मात्र, तो दुरुस्त होऊ शकला नाही. कंपनीने मुथ्था यांना मोबाइलवर एक वर्ष मोफत सेवा द्यावयाची होती. मात्र, तरीही दुरुस्तीचे पैसे आकारण्यात आले. अखेर मुथ्था यांनी २०१८ मध्ये ग्राहक तक्रार निवारणकडे दाद मागितली. येथील विक्रेता तसेच नोएडास्थित कंपनीविरुद्ध मुथ्था यांनी आरोप केले.
आयोगाने तक्रारीची दखल घेत मुथ्था यांना मोबाइलचे १४ हजार ९९० रुपये परत देण्याचे आदेश कंपनीला बजावले. त्याचबरोबर त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी दहा हजार रुपये कंपनीला द्यावयाचे आहेत. आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीसाठी ५ हजार रुपये खर्च झाल्याने ते पैसेही मुथ्था यांना देण्याचे आदेश पारित करण्यात आले. नादुरुस्त मोबाइलच्या तक्रारीवर नुकसानभरपाई देण्याचा आदेश मिळाल्याने मुथ्था यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या वतीने आयोगासमोर ॲड. किरण जऱ्हाड यांनी बाजू मांडली.