समदर्शी प्रभु नाम तिहारो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:53 AM2018-11-02T11:53:46+5:302018-11-02T12:49:26+5:30

अध्यात्म विद्या नाम विद्या, सा विद्या या विमुक्तये।। अध्यात्म विद्या हीच खरी विद्या आहे व तीच विद्या मानवाला भवसागरातून मुक्त करते.

Sembarashi Prabhu Nam Tiharo | समदर्शी प्रभु नाम तिहारो

समदर्शी प्रभु नाम तिहारो

अध्यात्म विद्या नाम विद्या, सा विद्या या विमुक्तये।। अध्यात्म विद्या हीच खरी विद्या आहे व तीच विद्या मानवाला भवसागरातून मुक्त करते. खरे तर असे आहे कि जी विद्या मुक्ती प्रदान करते तिलाच विद्या म्हणतात, बाकी सर्व अविद्या. माउली ज्ञानोबाराय, संत कबीर, जगदगुरू तुकाराम महाराज, रैदास, इस्लामची स्थापना करणारे महंमद पैगंबर हे आणि असे अनेक संत महात्मे, नेते, राजे लौकिक अर्थाने शाळेतही गेलेले नव्हते त्यांना परंपरेने, गुरूकडून. आप्तेष्ठांकडून जे ज्ञान मिळाले किंवा त्यांना ते ज्ञान स्फुरले. त्याच ज्ञानाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत केली. स्वत:चा ठसा उमटवला. ज्यांनी शालेय शिक्षण घेऊन तथाकथित उच्च विद्याविभूषित होऊनही त्यांना एवढी उंची गाठता आली नाहीत. खरे ज्ञान म्हणजे आत्म्याचे यथार्थ ज्ञान व ते ज्ञान फक्त अध्यात्म विद्याच करून देऊ शकते. अपरा विद्येमध्ये कितीही माणूस प्रवीण झाला तरीही त्या विद्या, ते ज्ञान व्यवहारातील भौतिक ज्ञान देऊ शकते मुक्त करू शकत नाही. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या । कवित्वादी गद्यं सुपद्यं करोती। हरे रंघ्रि पद्मे मनश्चेन्नं लग्नं । तत: किं तत: किं तत: किं तत: किम॥ शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, जोतिष वेदाचे हे सहा अंग आहेत. या सहा अंगांसहित वेद, शास्त्र मुखोद्गत आहेत. गद्य, कवित्व सहज करता येते पण हरीच्या पदपद्मी जर तुझे मनाचे लग्न म्हणजे ऐक्य झालेले नसेल तर मग काय उपयोग आहे तात्पर्य काहीही उजपयोग नाही. तसे एका अध्यात्म विद्येवाचून बाकी सगळ्या अविद्याच आहेत. आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाले आणि तोच आत्मा सर्वत्र आहे म्हणजेच आत्म्याचे आत्मत्वाने ज्ञान तर झाले पण आत्म्याचे ब्रहमत्वाने सुद्धा ज्ञान ज्याला झाले त्यालाच जगत ब्रह्म वाटत असते. म्हणजे तसा त्याचा अनुभव असतो त्यामुळे त्याच्या अंत:करणात कोणताच भेद राहत नाही कारण भेदाचे उपादान कारण अज्ञान असते आणि तेच अज्ञान जर नष्ट झाले तर भेदही सहज नष्ट होतो जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात ‘तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडनी ।।’ किंवा "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥१।। आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥२।। कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥३।। तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥४।। जर सर्वत्र भगवान विष्णूच आहे तर भेद कुणाचा करणार कारण स्वत:च स्वत:चा भेद कसा करणार? तर तो करू शकत नाही आणि जर भेद करीत असेल तर त्याचे अज्ञान गेले नाही असे निश्चित समजावे. ज्ञानी महात्मा भेद करीत नाही.
११ सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी ‘अमेरिकेतील माज्या बंधू आणि भगिनींनो’ अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतील अपूर्व विजयानंतर स्वामीजी पुन्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या एका संस्थानिक शिष्याने त्यांचे पूजन व राजशिष्टाचारानुसार भव्य सत्कार समारंभ आयोजित केला. स्वामीजींहि त्या कार्यक्रमाला गेले. हजारो लोक त्या सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रम सुद्धा खूप नयनरम्य झाला. रात्री त्या संस्थानिकाने त्यांच्या राज्यातील सुंदर गुणी नर्तिकेचे नृत्य स्वामी विवेकानंदांचे सन्मानार्थ आयोजित केले होते. स्वामीजींना तसे सूचित करण्यात आले तेव्हा स्वामीजींनी त्यांना सांगितले कि मी संन्यासी आहे आणि सन्याशाला असे शृंगारिक नृत्य गायन, वर्ज्य असते. राजाला मोठे वाईट वाटले त्याने ठीक आहे म्हणून तो त्यांना म्हणाला, स्वामीजी ती नर्तिका मोठी गुणी आहे. तुम्ही तिचे नृत्य पाहणार म्हणून तिने खूप उत्साहात तयारी केली आहे तर मग आमची विनंती आहे. तुम्ही नृत्य बघू नका पण जिथे ते नृत्य आहे त्याच्या शेजारच्या खोलीत बसून फक्त श्रवण करा, तसे आम्ही तिला सांगू म्हणजे तिलाही बरे वाटेल. स्वामीजींनी या गोष्टीला होकार दिला. सर्व तयारी याप्रमाणे झाली व निवडक निमंत्रित लोक त्या रंगमहालात येऊन बसले व ती नर्तिकाही आली. राजाने तिला सर्व हकीगत सांगितली. हेही सांगितले कि स्वामीजी येथेच शेजारच्या खोलीत बसले आहेत. त्या नर्तिकेला फार वाईट वाटले म्हणजे आम्ही इतके त्याज्य आहोत का? एक महात्मा आमची कला बघू शकत नाही? आमच्या गुणांचे कौतुक करू शकत नाही? ठीक आहे म्हणून त्या नर्तिकेने तिचे नृत्य सुरु केले त्या नृत्याला अनुसरून तिने संत सूरदासांच्या एका पदावर ते नृत्य सुरु केले ते पद असे होते ‘प्रभु मेरे अवगुण चित ना धरो।धृ ।।समदर्शी प्रभु नाम तिहारो, चाहो तो पार करो ेएक लोहा पूजा मे राखत, एक घर बधिक परो’ सो दुविधा पारस नहीं देखत, कंचन करत खरो ेएक नदिया एक नाल कहावत, मैलो नीर भरो, जब मिलिके दोऊ एक बरन भये, सुरसरी नाम परे, एक माया एक ब्रह्म कहावत, सुर श्याम झगरो अबकी बेर मोही पार उतारो, नहि पन जात तरो, ..... हे प्रभू माझे अवगुणांचा विचार करू नका कारण तुमचे नाव ‘समदर्शी’ आहे. एका लोखंडाची पूजा देवघरात होते व दुसरे लोखंड शिका-याच्या घरी बाणाच्या रूपात असते पण परीस भेद करीत नाही त्याच्या संगतीत कोणतेही लोखंड आले तर त्याचे तो सोने करतो. नदी आणि ओढा दोन नावे आहेत पण एकात कितीही घाण असते (गटारगंगा)पण ! ते गंगेत मिळाले कि त्यात भेद राहत नाही तर ते गंगाच होते. एक ब्रहम आणि एक माया असे दोन जरी वाटत असले तरीही ज्ञानी भेद करीत नाही कारण त्याला एका ब्रह्माचे यथार्थ ज्ञान झालेले असते . प्रभो मला(सूरदासाला) तुम्ही दूर करू नका माझे अवगुण विचारात घेऊ नका मला या भवसागरातून पार करा ..... मित्रांनो ! स्वामीजींनी हे पद ऐकले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ते झटकन त्या खोलीतून बाहेर आले आणि त्या नर्तिकेला साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले ,‘ आई ! मला माफ कर, माझे तू आज डोळे उघडले ज्ञानी खरेच भेद करीत नाही. माझी चूक झाली मी इत:पर भेद करणार नाही. सारा दरबार अवाक झाला आणि त्यांना ख-या महात्म्याचे दर्शन झाले. त्या नर्तिकेने स्वामीजींच्या पायावर लोटांगण घातले ती ढसाढसा रडत होती, तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्या नर्तिकेने सूरदासजींचे पद गाऊन एक वेगळाच चमत्कार घडवला. असो या प्रसंगातून एक लक्षात येते कि ज्ञानी भेद करीत नाही आणि जर ज्ञानी म्हणवत असूनही जर तो भेद पाळीत असेल तर तो ज्ञानी म्हणण्याच्या योग्यतेचा नाही असे निश्चितच समजावे.


भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी(पा) ता. नगर
मो. ९४२२२२०६०३

Web Title: Sembarashi Prabhu Nam Tiharo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.