सीना- मेहकरी योजनेचे लोकार्पण वादात
By Admin | Published: October 9, 2016 12:36 AM2016-10-09T00:36:21+5:302016-10-09T01:04:08+5:30
मिरजगाव : अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सीना मेहकरी उपसायोजनेचा लोकार्पण सोहळा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार
मिरजगाव : अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सीना मेहकरी उपसायोजनेचा लोकार्पण सोहळा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असताना योजनेच्या चाचणीला कर्जत तालुक्यातील जनतेने विरोध करून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
गोदावरी खोऱ्यातील नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाणीप्रश्न कायम धगधगत असताना आता सीना धरणातील पाण्यावरून नगर-बीड अशा नव्या पाणीसंघर्षाची थिणगी पडली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण या योजनेच्या चाचणीस सीना धरण पाणीबचाव कृतिसमितीने तीव्र विरोध केला आहे. सीना धरणात बाराशे दशलक्ष घनफूट पाणी भोसे खिंडीतून सोडण्याचे नियोजित असताना अजूनपर्यंत फक्त पिण्यापुरतेच कुकडीचे पाणी मिळाले. मेहकरी उपसायोजनेला मंजुरी देताना कुकडीतून बाराशे दशलक्ष घनफूट पाणी सीना धरणात सोडायचे, यापैकी सातशे दशलक्ष घनफूट पाणी कर्जतसाठी, तर पाचशे दशलक्ष घनफूट हे आष्टी तालुक्यातील मेहकरी प्रकल्पासाठी, असे पूर्वीचे नियोजन आहे.
कुकडीचे ठरल्याप्रमाणे पाणी आले नसताना उपलब्ध पाण्यावर चाचणी करून या भागातील शेतकरी वर्गास दुष्काळात लोटण्याचा प्रकार राज्यसरकार करीत आहे. पाण्याचा एक थेंबही उचलून देणार नाही. वेळप्रसंगी आम्ही आमचे रक्त सांडू, जलसमाधी घेऊ, पण पाणी उचलू देणार नाही, असा इशारा कृती समितीने दिल्याने सीना धरणाच्या डाव्या कालव्याजवळ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)