सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे
By अरुण वाघमोडे | Published: January 24, 2024 04:22 PM2024-01-24T16:22:53+5:302024-01-24T16:23:14+5:30
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित २८ जानेवारी रोजी नगर शहरात जिल्ह्यातील दक्षिण विभागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अहमदनगर: नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिवसेनेच्या (ठाकरे गट) निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवारही आहेत तसेच इतर पक्षांतील काही जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघासह दक्षिण मतदारसंघातही उमेदवार देऊन ताकतिनिशी ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहोत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करून महाविकास आघाडीकडे या जागेची मागणी करणार असल्याचे सेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी बुधवारी (दि.२४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित २८ जानेवारी रोजी नगर शहरात जिल्ह्यातील दक्षिण विभागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात आ. शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. यावेळी सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, स्मिता आष्टेकर, संदिप दातरंगे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मित्र पक्षांसोबत जागांचे वाटप झालेले नाही. मात्र, शिर्डीसह दक्षिणेच्या जागेवर आम्ही दावा सांगणार आहोत. तसेच नगर शहर आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात सेेनेची मोठी ताकत आहे. पक्षातील पदाधिकारी सक्षपणे काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.