विस्थापितांचा पहिला लढा उभारणारे ‘सेनापती बापट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:36 AM2019-08-16T11:36:57+5:302019-08-16T11:37:34+5:30
बॉम्ब बनवण्याच्या माहितीपुस्तिका भारतात सगळ्यात पहिल्यांदा आणण्याचं श्रेय बापट यांच्याकडे जसं जातं, तसंच देशातला किंवा बहुधा जगातला, पहिला विस्थापितांचा अहिंसक लढा उभारण्याचं श्रेयही त्यांच्याच नावावर आहे. मुळशी धरणाखाली ज्यांची जमीन गेली, त्यांच्यासाठी १९२१ मध्ये बापट यांनी सत्याग्रह उभारला आणि तेव्हापासून पांडुरंग महादेव बापट हे ‘सेनापती बापट’ झाले.
अहमदनगर: सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक म्हणजेच सेनापती बापट. १२ नोव्हेंबर १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आईचे नाव गंगाबाई व वडिलांचे नाव पांडुरंग. आई-वडिलांच्या संस्कारातूनच त्यांची उत्तम जडणघडण झाली. त्यांचे माध्यमिक आणि बी.ए. पर्यंतचे उच्च शिक्षण पुणे येथे झाले. शालेय वयातच त्यांनी विविध ग्रंथांचे वाचन केले. उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. चांगले सवंगडी मिळाले. यातूनच त्यांच्यातील लढाऊ समाजसेवक, तत्वचिंतक घडत गेला.
मातृभूमीची सेवा करण्याची शपथ सेनापती बापट यांनी १९०२ मध्ये घेतली होती. बापट बी.ए. परीक्षेत १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते इंग्लंडला गेले. एडिनबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच क्रांतिकारक विचारांचा प्रचार करीत. शेफर्ड सभागृहात सेनापती बापट यांनी केलेल्या भाषणामुळे त्यांची शिष्यवृत्ती मुंबई विद्यापीठाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली. शिष्यवृत्ती बंद झाली. शिक्षण थांबले. स्कॉटलंड येथील क्विस रायफल क्लबमध्ये त्यांनी निशाणेबाजीचे शिक्षण घेतले. पुढे त्यांचा संबंध श्यामजी कृष्णा वर्मा यांच्याशी आला. त्यांनी लंडनमध्ये इंडियन हाऊसची स्थापना केली होती. तसेच ते वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्य करत होते.
इंडिया हाऊसमध्ये असताना बापट यांचा परिचय वीर सावरकरांसोबत झाला. बापट यांना पेरीस बॉम्ब कौशल्य शिकण्यास पाठवण्यात आले. बॉम्ब बनवण्याच्या प्रकरणात इंग्रजांकडून बापट यांचा शोध घेण्यात येऊ लागला. इंदौरमध्ये त्यांना पकडण्यात आले. पाच हजार जमानत देऊन बापट पुन्हा पारनेरला आले व सामाजिक सेवा करू लागले. परंतु पोलीस व गुप्तचर त्यांच्यावर नजर ठेवून होते. दरम्यानच्या काळात १ नोव्हेंबर १९१४ मध्ये त्यांना पुत्ररत्न झाले. या निमित्ताने त्यांनी हरिजनांसोबत भोजन कार्यक्रम घडवून आणला. अंदमानमध्ये काळ्या पाण्याची सजा भोगणा-या क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी बापट यांनी नारायण दामोदर सावरकर यांच्यासोबत हस्ताक्षर अभियान चालवले. तसेच त्यांनी राजबंदी मुक्त मंडळाची स्थापना केली. मुळशी प्रकरणात २३ आॅक्टोबर १९२३ ला बापट यांना तिस-यांदा सजा झाली. यानंतर येथून सुटल्यावर बापट यांनी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे त्यांना हैदराबाद जेलमध्ये ७ वर्षांची सजा झाली. बापट हे जेलमध्ये असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले.
येरवडा जेलमध्ये गांधींजींनी उपोषण सुरू केल्यानंतर इकडे बापट यांनीही त्यांच्या समर्थनासाठी उपोषण सुरू केले. उपोषणामध्ये स्वास्थ्य खराब झाल्यानंतर त्यांना बेळगावला पाठवण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली, तेव्हा सेनापती बापट यांना महाराष्ट्र शाखेचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. दुस-या महायुद्धाच्या वेळी कोल्हापुरात कलम १४४ लागू असताना बापट यांनी भाषण दिल्यामुळे त्यांना अटक करून कराडला आणण्यात आले होते.
५ एप्रिल १९४० ला त्यांना मुंबई स्टेशनला अटक करण्यात आली व कल्याणला सोडण्यात आले. त्यांच्या मुंबई प्रवेशावर प्रतिबंध घालण्यात आला. तसेच त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले. नजरकैदेत ठेवण्यात आलेले असतानाही त्यांनी चौपाटीवर पोलीस कमिशनर स्मिथ यांच्या उपस्थितीत उर्दूमध्ये भाषण दिले. आणि याच दरम्यान इंग्रजांचा पुतळा व युनियन जॅक जाळला गेला. यामुळे सेनापती बापट यांना अटक करण्यात आले व नाशिक येथे ठेवण्यात आले. स्वातंत्र्याच्या दिवशी १५ आॅगस्ट १९४७ रोजी सेनापती बापट यांनी पुण्यामध्ये झेंडा फडकवला होता. २८ नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांचे निधन झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी असा त्यांचा वैचारिक प्रवास झाला. स्वातंत्र्योत्तर काळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी विशेष पुढाकार घेतलेला दिसून येतो.
आंदोलन करीत असताना कारागृहात आंदोलनाला पूरक साहित्यही त्यांनी लिहिले़ ते प्रकाशितही केले. त्यांनी अपुरे राहिलेले छोटेसे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांनी बरेचसे लेखन मराठीत, थोडे इंग्रजीत व संस्कृतमध्ये केलेले आहे. क्रांतिवादी राजकारणाचे समर्थन करणारे, भगवतगीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले, राष्ट्रमुक्ती व अन्याय, प्रतिकार या दोन मुद्यांना अनुसरून युक्तिवाद केलेले त्यांचे साहित्य आहे. चैतन्यगाथा हे पुस्तक वाचले म्हणजे त्यांचे मूलभूत विचार आपल्या लक्षात येतात. त्यांनी मराठीमध्ये योगी अरविंदांच्या इंग्लिशमधील अध्यात्मिक तत्त्वज्ञानावरील ग्रंथाचा उत्कृष्ट अनुवाद केलेला आहे. अरविंदांचा ‘दिव्य जीवन’ हा मोठा ग्रंथ बापटांनी मराठीत उतरविला आहे. समग्र साहित्य ग्रंथ (१९७७ ) मध्ये त्याचे साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने प्रकाशन करण्यात आले.
त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. सेनापती बापट म्हटल्यानंतर विचारवंत, समाजसुधारक, क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ व्यक्तिमत्त्व आपल्या डोेळ्यासमोर तरळते.
परिचय
जन्म : १२ नोव्हेंबर १८८०
गाव : पारनेर
मृत्यू : २८ नोव्हेंबर १९६७
भूषविलेली पदे
- १९२३ : मुळशी सत्याग्रह व अटक
- १९४० : स्वातंत्र्य चळवळीमुळे मुंबई प्रवेशबंदी
- स्वातंत्र्य आंदोलनात पाच वेळा अटक
- १५ आॅगस्ट १९४७ : पुण्यात स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकविला
लेखक - डॉ. रंगनाथ आहेर,(प्राचार्य, पारनेर महाविद्यालय)