५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात सेनेच्या ऋषभ भंडारी याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:13+5:302021-06-27T04:15:13+5:30
मयत झालेल्या जागा मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदार महेश सुमतीलाल संचेती, (रा. विनायकनगर) यांची ५० लाख रुपयांची ...
मयत झालेल्या जागा मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदार महेश सुमतीलाल संचेती, (रा. विनायकनगर) यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये १६ जानेवारी रोजी ऋषभ भंडारी याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जून २०१९ मध्ये नगर तालुक्यातील वाळुंज येथील जागेचा व्यवहार महेश संचेती व ऋषभ भंडारी यांच्यात ठरून त्यापोटी संचेती यांनी ५० लाख रुपयांचे साठेखत केले होते. मात्र काही दिवसांतच सदर जमिनीचे मूळ मालक हे २०१८ सालीच मयात झाले असून त्यांच्या जागी ऋषभ भंडारी याने तोतया जागामालक उभे करून बनावट साठेखत केल्याचे समोर आले होते. संचेती यांनी भंडारी याच्याकडे साठेखताचे ५० लाख रुपये परत मागितले तेव्हा भंडारी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर संचेती यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, भंडारी याचा जिल्हा न्यायालय व खंडपीठातही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.