ज्येष्ठ नेत्याकडून वाळू लिलावास विरोध करणा-या ग्रामस्थाला मारहाण, ‘या’ गावच्या ग्रामसभेतही झाला गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:27 AM2021-02-28T11:27:34+5:302021-02-28T11:28:14+5:30
वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी मारहाण केल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला आहे.
राहुरी : वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी मारहाण केल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला आहे.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रामपूर येथे ग्रामसभा सुरू झाली. प्रारंभापासूनच या ग्रामसभेत वादावादीला सुरूवात झाली. याच दरम्यान प्रवरा नदीपात्रातील वाळू लिलावाचा विषय चर्चेला येताच ज्येष्ठ नेते, तथा राहुरी कारखान्याचे माजी अध्यक्ष यांनी वाळू लिलावाला सहमती दिली.
मात्र, ग्रामस्थांनी वाळू लिलावाला विरोध केला असता ‘त्या’ ज्येष्ठ नेत्याने कसलाही विचार न करता एका शेतकरी ग्रामस्थाला मारहाण केली. लगेचच ‘त्या’ नेत्याच्या समर्थकांनीही दुसऱ्या ग्रामस्थाला मारहाण केली. वाळू लिलावासाठी हात वर करून मतदान घेण्यात आल्यानंतर वाळू लिलावाच्या विरोधात मतदानाचे पारडे गेल्याने ज्येष्ठ नेत्याच्या रागाचा पारा वाढला. या घटनेमुळे गावात तणाव वाढला होता.