कोरोनामुक्तीचे वेगळे प्रयोग देशपातळीवर राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:21 AM2021-05-21T04:21:59+5:302021-05-21T04:21:59+5:30

अहमदनगर : कोरोनामुक्तीचे अनेक जिल्ह्यात वेगवेगळे यशस्वी प्रयोग राबविण्यात आले आहेत. त्याची देशपातळीवर अंमलबजावणी करण्यात येईल. प्रत्येक गाव कोरोनामुक्त ...

Separate experiments on coronation will be carried out at the national level | कोरोनामुक्तीचे वेगळे प्रयोग देशपातळीवर राबविणार

कोरोनामुक्तीचे वेगळे प्रयोग देशपातळीवर राबविणार

अहमदनगर : कोरोनामुक्तीचे अनेक जिल्ह्यात वेगवेगळे यशस्वी प्रयोग राबविण्यात आले आहेत. त्याची देशपातळीवर अंमलबजावणी करण्यात येईल. प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी व तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे देशभरातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकारी होते. ६० पैकी केवळ १२ जिल्हाधिकाऱ्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात महाराष्ट्रातून अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा एकमेव समावेश होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी ऑनलाईन उपस्थित होते.

भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांना जिल्ह्यात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, खासगी हॉस्पिटलकडून ऑक्सिजनची मागणी नोंदवून तेथील रुग्णसंख्येप्रमाणे त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आल्याने उपलब्ध ऑक्सिजन आणि मागणीचे प्रमाण स्थिर करण्यात प्रशासनाला यश आले. राज्य शासनाच्या धोरणांनुसार जिल्ह्यात तातडीने ऑक्सिजन निर्मिती प्लान्टची उभारणी करण्यात आली. ग्रामपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद सुरू केला. आपला गाव आपली जबाबदारी ही संकल्पना मांडली. प्रत्येक बाधित व्यक्तीला थेट कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

..............

पंतप्रधानांपर्यंत पोहोचवली हिवरेबाजारच्या कोरोनामुक्तीची माहिती

आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आणि हिवरेबाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव कोरोनामुक्त केले. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलावून त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांना ऐकवले, त्याचाही सकारात्मक परिणाम झाला, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिवरेबाजारच्या कोरोनामुक्तीच्या पॅटर्नची माहिती पंतप्रधानांसमोर मांडली.

--------

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले कौतुक

अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भोसले यांच्याकडून त्यासंबंधीची माहिती घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालक सचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करून डॉ. भोसले यांचे कौतुक केले.

Web Title: Separate experiments on coronation will be carried out at the national level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.