जमावाच्या हल्ल्यात सिरियल किलर अण्णा वैद्यचा मृत्यू

By साहेबराव नरसाळे | Published: December 10, 2023 11:24 PM2023-12-10T23:24:08+5:302023-12-10T23:25:58+5:30

सुगाव खुर्द येथील घटना : अल्पवयीन मुलीची काढली होती छेड

serial killer anna vaidya died in mob attack | जमावाच्या हल्ल्यात सिरियल किलर अण्णा वैद्यचा मृत्यू

जमावाच्या हल्ल्यात सिरियल किलर अण्णा वैद्यचा मृत्यू

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अकोले : तालुक्यातील सुगाव खुर्द येथील महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) याने रविवारी (दि. १०) सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केली. त्यास संतप्त जमावाने चोप दिला. उपचारासाठी त्याला संगमनेर येथे हलवण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.

चार महिलांचा खून करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होता. संगमनेर येथील ताराबाई आसाराम राऊत (वय ४५) या महिलेचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेरच्या न्यायालयाने वैद्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हे साखळी खून प्रकरण उजेडात आले. या प्रकरणात त्याला जन्मठेपदेखील झाली होती. नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर तो सुगाव येथे राहत होता.

रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली. त्यामुळे संतप्त जमावाने त्यास मारहाण केली व पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अकोले पोलिसांत पोक्सो, ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होत असताना त्याला उपचारासाठी रात्री ८.३० वाजता संगमनेर येथे हलवण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

चार महिलांच्या खुनाचा आरोप

अण्णावर विविध प्रकारच्या गुन्ह्यांसह चार महिलांचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाच्या पहिल्या खटल्यात संगमनेर न्यायालयात त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर काही महिन्यांत दुसऱ्या खुनाच्या खटल्यातून संगमनेरच्या न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली; तर तिसऱ्या त्याला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; तर एका महिलेच्या खुनाचा खटला प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: serial killer anna vaidya died in mob attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.