प्लास्टिक कच-याचे गंभीर संकट - मेधा ताडपत्रीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:37 PM2018-03-15T18:37:10+5:302018-03-15T18:37:34+5:30
श्रीरामपूर महिला मंडळाचा अमृत महोत्सव
श्रीरामपूर : घराघरातून, दुकाने व मॉलमधून सुका व प्लास्टिक कचरा वेगळा साठवून त्याचे योग्य व्यवस्थापन झाले तरच शुध्द हवा, पाणी व अन्न यांची उपलब्धता होईल, अन्यथा भावी पिढी रोग व आजाराला बळी पडेल, असा इशारा डॉ. मेधा ताडपत्रीकर यांनी दिला.
श्रीरामपूर महिला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंडळाच्या विश्वस्त वत्सल काळे होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होत्या.
डॉ.ताडपत्रीकर म्हणाल्या, प्लास्टिक उपयुक्त असले तरी त्याचा कचरा हवा, पाणी, अन्न दूषित करते. रूद्र एन्व्हायरमेंट सोल्युशनने ज्या रासायनिक प्रक्रियामुळे पेट्रोलियम पदार्थापासून प्लास्टिक बनते. त्याच्या बरोबर उलट प्रक्रिया प्लास्टिक कच-यावर केली आहे. त्यातून परत इंधन तेल मिळविण्याचे पेटंट मिळविले आहे. पश्चिम महाराष्टÑात अनेक शहरामध्ये प्लास्टिक कच-याच्या पुनर्वापरासाठी जागृती मोहीम राबविली आहे. या कच-याचा वापर उत्तम प्रकारच्या रस्ते बांधणीसाठीही होतोे.
नगराध्यक्षा आदिक यांनी शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मंडळाच्या अध्यक्षा छाया गांधी यांनी प्रास्तविकातून प्लास्टिक कच-याच्या भीषण संकटाची जाणीव करून दिली.
माजी आमदार जयंतराव ससाणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्योती भळगट व शीतल मुथा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ.अंजली आगाशे, राणी बाबेल, शांता इराबत्तीन, अनिता जोशी, मीना चंदन,निता जगताप, शैलजा वाघमारे, पूजा नगरकर, सविता बधे आदींनी परिश्रम घेतले.