सेवा हाच विखे परिवाराचा धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:42+5:302021-06-16T04:29:42+5:30

शिर्डी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वास्तव खूप भयानक होते. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेवा ही संघटन’ असा ...

Service is the religion of the Vikhe family | सेवा हाच विखे परिवाराचा धर्म

सेवा हाच विखे परिवाराचा धर्म

शिर्डी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वास्तव खूप भयानक होते. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेवा ही संघटन’ असा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. प्रवरा कोरोना केअर सेंटर हा सेवेचाच एक भाग होता. विखे परिवारासाठी सेवा हाच धर्म आहे. कोरोना सेंटरमधून एक हजाराहून अधिक रुग्णांना मदत करता आली, याचे मोठे समाधान असल्याची भावना आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

सोमवारी (दि. १४) विखे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधून विविध विषयावर आपले परखड भाष्य केले. विखे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेतही प्रवरा परिवाराच्या माध्यमातून लोकांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या लाटेत गावाचे आरोग्य सर्वेक्षण, मोफत अन्नधान्य, सिंधू अन्नछत्र असे उपक्रम राबवून नागरिकांना दिलासा दिला. डॉ. विखे पाटील फाउंडेशनने प्रवरा रुग्णालयाच्या माध्यमातून राज्यातील पहिले कोविड रुग्णालय सुरू केले.

दुसऱ्या लाटेचा अंदाज कोणालाच आला नाही. रुग्णांची संख्या वाढत होती. सरकारची आरोग्य व्यवस्था कमी पडली. ग्रामीण भागात उपचार उपलब्ध मिळत नव्हते, अशा परिस्थितीत कोविड सेंटर सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून पाचशे बेडचे रुग्णालय सुरू करून आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देता आल्या. समाजातील घटकांचे सहकार्य यासाठी मिळाले. सामाजिक बांधिलकीने हे रुग्ण सेवेचे काम करता आल्याचे समाधान त्यांनी बोलून दाखविले.

कोरोना संकटात राज्य सरकारचे निर्णय फक्त कागदोपत्री राहिले. कोणत्याच घटकांना राज्य सरकार मदत करू शकले नाही. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याने सरकार ना ऑक्सिजनचे व्यवस्थापन करू शकले ना रेमडेसिविर देऊ शकले.

..............

मंत्र्यांमुळेच रुग्णांची लूट

जिल्ह्यात तीन मंत्री असूनही ते कोणतीच मदत करू शकले नाहीत. बैठका आणि आढावा सुरू होता. प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच नव्हती. एकही मंत्री स्वत:च्या तालुक्यात कोरोना सेंटर सुरू करू शकला नाही. याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागले. मंत्रीच खासगी व्यवस्थेवर अवलंबून राहिले. यातून रुग्णांची आर्थिक लूट झाली.

.....................

केंद्राची मदत भरीव, राज्याचे काय

राज्य सरकार नेहमीच केंद्र सरकारच्या नावाने आरोप करते. मात्र केंद्र सरकारने पहिल्या लाटेत आत्मनिर्भर योजना जाहीर करून विविध घटकांना दिलासा दिला. दुसऱ्या संकटात केंद्राने ऑक्सिजन पुरवठा केला. रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता करून दिली. कोविड लसीच्या मात्रा उपलब्ध करून दिल्यानेच राज्यात अडीच कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण होऊ शकले. १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याचा निर्णय देखील पंतप्रधान मोदीनी जाहीर केला. मोफत धान्य योजनेलाही दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिली. राज्य सरकारचे असे कोणतेही निर्णय जनतेच्या हितासाठी झाले नसल्याची खंत विखे यांनी व्यक्त केली.

..................

मराठा समाजाला आरक्षण मिळावे

मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपने यापूर्वीच भूमिका जाहीर करून समाज या प्रश्नासाठी जी भूमिका घेईल त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नासाठी विविध संघटना आंदोलन करीत आहेत. या सर्वांनी एका व्यासपीठावर यावे म्हणून मी सर्वांशी बोलतोय. अनेकांनी यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. याबाबत बैठकाही झाल्या. पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार असून ओबीसीचे आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका कायम असल्याचे विखेंनी सांगितले.

Web Title: Service is the religion of the Vikhe family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.