निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:20 AM2021-03-22T04:20:04+5:302021-03-22T04:20:04+5:30
शेवगाव : शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
शेवगाव : शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी केली.
काकडे यांनी रविवारी शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव भागातील नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी शंकरराव काटे, अर्जुन काटे, भानुदास पालवे, सदाशिव विघ्ने, ज्ञानेश्वर गोर्डे, अशोक काकडे, महादेव डोंगरे, रामनाथ काटे, विठ्ठल मराठे, नितीन पायघन, मोहनराव कातकडे, सुरेश पायघन, प्रकाश वैरागळ, भाऊराव शिंदाडे, एकनाथ पायघन, बापूसाहेब पायघन, भाऊसाहेब मराठे आदी यावेळी उपस्थित होते.
काकडे म्हणाले, गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, कांदे, बाजरी यासह पपई, पेरू, आंबा आदी फळबागांचाही समावेश आहे. सध्या सर्वत्र मका, गहू, हरभरा, बाजरी काढणीला आले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करताना मंडलानुसार नुकसानभरपाई हा निकष बाजूला ठेवून प्रत्यक्ष गटानुसार पाहणी करून नुकसानभरपाई द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
मागील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची अद्यापही काही भागांत नुकसानभरपाई मिळाली नाही. अशातच काल झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकास शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी म्हटले आहे.
---
२१ काकडे
आखेगाव परिसरात नुकसाग्रस्त पिकांची पाहणी करताना ॲड. शिवाजीराव काकडे.