पाच दिवसांत सत्तर आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:40 AM2018-05-06T10:40:33+5:302018-05-06T10:41:11+5:30
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत केलेल्या धडक कारवाईत विविध गुन्ह्यांतील ७० आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत केलेल्या धडक कारवाईत विविध गुन्ह्यांतील ७० आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे.
केडगाव व जामखेड हत्याकांडांनंतर गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन नागरिकांना पोलिसांबाबत विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने २९ एप्रिलपासून जिल्ह्यात आॅल आउट मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ६६८ जणांना समन्स बजावण्यात आले़ २६९ जणांना नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले. दारूबंदी कायद्यातंर्गत १०७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली़ आर्म अॅक्ट अंतर्गत ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार व नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्यांची पोलिसांनी यादी तयार केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असेल्या अशा सर्वच गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गावठी कट्टा विकणारे, संघटित गुन्हेगारी करणारे, वाळूतस्कर, दारूविक्री असे गुन्हेगार सध्या पोलिसांचे लक्ष्य आहेत. चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी राहुरी येथील वाळूतस्करांची टोळी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केली. जिल्ह्यातील आणखी २० टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री तपोवन रोडवरील भिस्तबाग महालाजवळ सापळा लावून एका तरुणाला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. स्वप्नील अशोक ढवण (वय ३२ रा़ ढवण वस्ती, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कट्ट्यासह एक जिवंत काडतूस, एक टाटा सफारी असा एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कैलास देशमाने, कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, संदीप घोडके, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय अडबल, विजय ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.