माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:52 PM2019-07-18T18:52:22+5:302019-07-18T18:54:47+5:30
सोनई-करजगांवसह 18 गावांच्या पाणी योजनेसाठी करण्यात आलेल्या रास्तारोको प्रकरणी चार दिवसानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोनई : सोनई-करजगांवसह 18 गावांच्या पाणी योजनेसाठी करण्यात आलेल्या रास्तारोको प्रकरणी चार दिवसानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवार (13 जुलै) रोजी राहुरी-सोनई रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. नेवासा तालुक्यातील पिण्याच्या पाणी प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, तसेच ईतर सामाजिक प्रश्नी गडाखांनी आंदोलने केलेली आहे. मागील आठवड्यात सोनई-करजगांवसह 18 गावांच्या पाणी योजनेच्या प्रश्नावरून या सर्व गावांच्या ग्रामस्थांसह गडाख यांनी सोनईत सुमारे तीन तास रास्ता रोको केला होता.
सोनई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार गडाख यांच्यासह दादासाहेब शंकर वैरागर, संदीप अशोक कुसळकर, खलील इनामदार, किरण जाधव, गणेश तांदळे, संजय जंगले, यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात भादवि कलम 143, 149, 341 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37, 1(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव,वडाळा बहिरोबा प्रकरणातील अटक प्रक्रिया गाजली
पाटपाण्याच्या प्रश्नावरून त्यांनी घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे आंदोलने केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यासाठी अटक वॉरट बजावले होते. पोलीस यंत्रणेने त्यांना अटक करण्यासाठी नगर येथील निवासस्थानाच्या झडती प्रकरणाने खळबळ उडाली होती.