साडेसात हजार घरकुल लाभार्थ्यांना नाहीत जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:59 AM2021-02-20T04:59:24+5:302021-02-20T04:59:24+5:30

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत गेल्या पाच वर्षांत सुमारे ...

Seven and a half thousand household beneficiaries have no space | साडेसात हजार घरकुल लाभार्थ्यांना नाहीत जागा

साडेसात हजार घरकुल लाभार्थ्यांना नाहीत जागा

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत गेल्या पाच वर्षांत सुमारे ३९ हजार घरकुलांची कामे पूर्ण झाली. परंतु साडेसात हजार लाभार्थ्यांना जागा नसल्याने घरकुल मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून संबंधित प्रशासनाशी संपर्क करून या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने घरकुलांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास, तसेच पारधी आवास योजना राबविण्यात येते. जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ही कामे केली जातात. सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांत नगर जिल्ह्याला ८६ हजार ५६४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी ८० हजार १०१ घरांची नोंदणी झाली पैकी ६९ हजार ५५६ घरकुले मंजूर झाली. त्यातील ३८ हजार ९४५ घरकुलांचे कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत म्हणजे ४५ टक्के उद्दिष्ट यंत्रणेने गाठले आहे.

या प्रक्रियेदरम्यान ९ हजार ३८७ लाभार्थी अपात्र ठरल्याने त्यांना वगळ्यात आले आहे. शासकीय नोकरी असणे, मृत, परागंदा यासह अन्य कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली.

दरम्यान, घरकुले मंजूर झाली असली तरी अनेक लाभार्थ्यांना गावात स्वत:च्या मालकीच्या जागा नाहीत. गेल्या वर्षभरापूर्वी ९ हजार ४४८ जागा नसलेले लाभार्थ्यां होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुढाकार घेऊन आतापर्यंत १ हजार ९२४ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी गावठाणाची जागा, बक्षीसपत्र, ९९ वर्षाचा करार, तसेच इतर खरेदी खत झाल्याने घरकुलांसाठी जागा उपलब्ध झाली. मात्र, अजूनही ७ हजार ४४८ घरकुल लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही. सध्या हे लाभार्थी शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत. त्यामुळे गावात असलेली शासकीय जागाच त्यांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून शेती महामंडळाकडे ७१५, गायरान जमिनीसाठी ७३१, वन विभागाकडे २९९, पाटबंधारे विभागाकडे ४४८, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ११६, साखर कारखान्यांकडे ३०२, खासगी शेतकऱ्यांकडे भाडोत्री १ हजार ९९५, तसेच महाराष्ट्र शासनाच्या ८१३ जागांची मागणी करण्यात आलेली आहे. लवकरच ही जागा उपलब्ध होऊन वंचितांना घरे मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

घरकुलांची कामे वेगात व्हावीत यासाठी शासनाकडून राज्यात २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान महाआवास अभियान राबविण्यात सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ७० घरकुलांची कामे अभियानात झाली आहेत.

------------

नगर जिल्ह्यातील घरकुल योजनांचा अहवाल

गेेल्या पाच वर्षांतील उद्दिष्ट - ८६५६४

घरकुलांची नोंदणी - ८०१०१

मंजूर- ६९५५६

अपात्र - ९३४६

जागा नसलेले लाभार्थी - ७४४८

आतापर्यंत पूर्ण कामे - ३९९४५

प्रगतीतील कामे - ३०६११

पूर्णत्वाची टक्केवारी - ४४.९९

--------

Web Title: Seven and a half thousand household beneficiaries have no space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.