जिल्ह्यासाठी साडेसात हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:39+5:302021-06-17T04:15:39+5:30
नेवासा : खरीप हंगामासाठी येत्या आठ दिवसात जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध केले जाणार आहे, ...
नेवासा : खरीप हंगामासाठी येत्या आठ दिवसात जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन, उसासह इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे यासाठी गडाख यांनी बुधवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
नेवासा तालुक्यासाठी ६९१ मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक आहे. त्यातील ७० टक्के म्हणजे ४८३.७० मेट्रिक टन युरिया खत शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकासाठी असलेली मागणी विचारात घेऊन परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी यापूर्वीच झाली होती. यातून नेवासा तालुक्यासाठी ४८३.७० मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तालुक्यासाठी आतापर्यंत पुरवठा झालेल्या २ हजार ०७६ मेट्रिक टन युरियापैकी तालुक्यात मुळा बाजारमार्फत सोनई व नेवासा येथून १३० मेट्रिक टन युरियाची ९३९ शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली. मुळा बाजारमार्फत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरिया खत मिळावे यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास तीन गोण्या खत आधार कार्ड लिंक करून व प्रति गोणी २६६ रूपये दराप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले. नेवाशासह जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार असल्याचेही गडाख यांनी सांगितले.