शेवगाव तालुक्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:07+5:302021-05-08T04:21:07+5:30
शेवगाव : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी (दि.११) ते सोमवारी (दि.१७) या कालावधीमध्ये शेवगाव शहरासह तालुक्यात सात दिवसांचा जनता ...
शेवगाव : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी (दि.११) ते सोमवारी (दि.१७) या कालावधीमध्ये शेवगाव शहरासह तालुक्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, हॉस्पिटल वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवारी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या उपस्थितीत प्रशासनाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला तालुक्यातील ७० ग्रामपंचायतचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या, उपाययोजना, कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या किटची उपलब्धता, लसीकरण, जनता कर्फ्यू आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी केकाण व पागिरे यांनी ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी दरम्यान होणाऱ्या गर्दीचा मुद्दा उपस्थित केला. गर्दीमुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली. प्रत्येक गावात जनता कर्फ्यू लावण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला सर्व उपस्थितांनी पाठिंबा देऊन ११ मे ते १७ मे या काळात जनता कर्फ्यू पाळण्याचे निश्चित करण्यात आले.
ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र सदर दुकानात होणारी गर्दी, तसेच अत्यावश्यक कामाच्या नावाखाली घराबाहेर पडून गावभर फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती. परिणामी ब्रेक द चेन काळात रुग्ण संख्येत घट होण्याऐवजी दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढून मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले होते. याला कुठेतरी आळा बसावा यासाठी जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.