ऑक्सिजन अभावी सात जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:25 AM2021-04-30T04:25:10+5:302021-04-30T04:25:10+5:30
अहमदनगर : येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने ...
अहमदनगर : येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने लगेच संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने नव्हे तर कोरोना आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे झाल्याची सारवासारव केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई आहे. जिल्ह्यासाठी रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी २० तर मंगळवारी ५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने तो ऑक्सिजन अपुरा पडत आहे. उपलब्ध झालेला ५० टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालय व शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयात पाठवला जातो. याबाबत समप्रमाणात व न्याय्य पद्धतीने वाटप होत नसल्याने अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने तेथील रुग्णांचा जीव ऑक्सिजन अभावी गुदमरला आहे. याकडे लक्ष द्यायला प्रशासनाकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळावा यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कोणतेही नियोजन होत नसल्याचे दिसते आहे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. तिथे रांगा असल्याने खासगी रिफिलिंग प्लांटवर दहा ते बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. हीच परिस्थिती एका खासगी रुग्णालयातील रुग्णांवर बेतली व त्यातच त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
---
प्रशासन पोहोचले हॉस्पिटलमध्ये
दरम्यान एका खासगी रुग्णालयात सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’सह अन्य माध्यमांनी ऑनलाईनवर प्रसिद्ध करताच आरोग्य यंत्रणेने ‘त्या’ खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर सदर मृत्यू ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून झाले नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान पोलीस यंत्रणेने ही हॉस्पिटल भोवती पहारा दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनीही सदर हॉस्पिटला भेट देऊन चौकशी केली.
---------------
त्या खासगी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू हा एकाच वेळी नव्हे तर २४ तासांमध्ये झालेला आहे. संबंधित हॉस्पिटलला ऑक्सिजनचा आवश्यक तेवढा साठा उपलब्ध होता. गुंतागुंतीच्या आजारामुळे येथील रुग्ण आधीच गंभीर होते. त्यात कोरोनाची बाधा झाल्याने ते आणखी गंभीर बनले होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याचे त्यांचा मृत्यू झाला.
-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक
-----------
जिल्हाधिकारी म्हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका
सात जणांच्या मृत्युची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सदरचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता आहे. मंगळवारी दिवसभरात ४९ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला असून बुधवारीही तेवढाच ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे. जिल्ह्याता तेवढाच कोटा असून त्याप्रमाणे ऑक्सिजन मिळत आहे. तो सर्व खासगी रुग्णालयांना दिला जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.