तीन एकर डाळिंबातून सात लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:16 PM2018-06-29T16:16:01+5:302018-06-29T16:16:03+5:30
ज्वारी, बाजरी, मका अशी पिके घेऊन त्यांचा उत्पादन खर्चही निघणे अनेकदा मुश्किल झाले. त्यातून भरीव असे काहीही होत नव्हते. अखेर नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी धाडस करून आपल्या शेतात ३ एकरांवर ९५० डाळिंब झाडे लावायचा निर्धार केला. यातून त्यांनी सात लाखांचे उत्पन्न मिळविले
सुहास पठाडे
ज्वारी, बाजरी, मका अशी पिके घेऊन त्यांचा उत्पादन खर्चही निघणे अनेकदा मुश्किल झाले. त्यातून भरीव असे काहीही होत नव्हते. अखेर नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी धाडस करून आपल्या शेतात ३ एकरांवर ९५० डाळिंब झाडे लावायचा निर्धार केला. यातून त्यांनी सात लाखांचे उत्पन्न मिळविले.
डाळिंबाच्या या झाडांसाठी ७५ लाख लिटर पाणी साठवण क्षमतेच्या शेततळ्याची १६ गुंठ्यांवर निर्मिती केली. त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला. गेल्या अडीच वर्षांत अनेक अडचणींचा सामना करीत तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी डाळिंब बागे चा प्रयोग यशस्वी केला. त्यातून डाळिंब रोपांची लागवड केली असून, त्यानंतर उर्वरित दोन एकरांत आंबा प्रयोग त्यांनी राबविला. या नव्या बागेतील आंतरपीक म्हणून पेरू, लिंबू, चिक्कू, कढीपत्ता, नारळ, आवळा लागवडीही त्यांनी केली. शेतीत असे वेगवेगळे प्रयोग करून प्रयोगशील शेतीचा आदर्श निर्माण केला असून, या सर्वांतून नऊ लाखांचे उत्पन्न मिळविले.
जिरायती शेतात ज्वारी सारखे पीक घाडगे घेत होते. दरम्यान जिल्ह्यातील राजुरी येथील डाळिंबरत्न डॉ. बाबासाहेब गोरे यांनी डाळिंब लागवडीचा सल्ला देऊन मार्गदर्शनाची तयारीही दाखविली. पण, या भागात कोणीही फळबाग अथवा डाळिंब बाग असा प्रयोग केलेला नव्हता. त्यामुळे मनात धाकधुक होती. पण एकदा डाळिंबाचा प्रयोग करायचाच, असा निर्धार त्यांनी केला. भगवा जातीची ९५० रोपे आणून तीन एकरांवर लागवड केली. दोन झाडांतील अंतर ९ बाय १४ फूट ठेवून त्याला ठिबक केले. पहिले दीड वर्षे त्याच्यामध्ये आंतरपीकही घेतले. त्यामुळे शेत रिकामे राहिले नाही. डाळिंब रोप लागवडीनंतर पहिला बहार (फळ) २४ महिन्यांनंतर धरायचा असे त्यांनी ठरविले. त्यानुसार झाडाची वाढ चांगली व्हावी, यासाठी घाडगे हे दररोज शेतात जाऊन झाडांची पाने पाहायचे. त्यावरून त्यांना रोगाचा अंदाज यायचा. त्वरित औषध फवारणीचा त्यांना फायदाच झालाय, परंतु त्यामुळे खर्चही अधिक झाला. अगदी सुरुवातीपासूनच रासायनिक खतांबरोबरच शेणखतही मोठ्या प्रमाणावर वापरले. रासायनिक खते ठिबकद्वारेच देण्याला प्राधान्य दिले. बहार (फळ) धरल्यापासून त्यांची खरी कसरत सुरू झाली. दररोज शेतात जाऊन फुलांच्या होणाऱ्या वाढीवर बारकाईने नजर ठेवत होते. त्यातच परिसरात एकही डाळिंब बाग नसल्याने इतर रोगांचा प्रादुर्भावही झाला नाही. त्याचा फायदा उत्पादन वाढण्यात झाला. एका झाडाला सुमारे साठ ते सत्तर इतके फळे लागली आहेत. एका फळाचे वजन अंदाजे ३०० ते ६०० ग्राम इतके असून, १२ टन माल निघाला. त्यामुळे पहिल्याच बारमधून ७ लाखांचे उत्पादन मिळाले असून, अनेक व्यापाºयांनी डाळिंबाची पाहणी केली.
यामधून तब्बल चार ते साडेचार महिन्यांत डाळिंबासंदर्भात बारकावे माहीत झाले. त्याचा फायदा पुढील बारमधील डाळिंब उत्पादन वाढीवर होईल, असा अंदाज आहे. शेतीचा खरा पाणीप्रश्न मार्चपासून सुरू होतो. त्यावेळी उन्हाची तीव्रताही वाढलेली असते. त्यामुळे पाणीही अधिक लागते. त्याचा विचार करून तीन ते चार लाख रुपये खर्च करून १६ गुंठ्यांमध्ये शेततळ्याची निर्मिती केली. त्याची पाणी साठवण क्षमता ७५ लाख लिटर आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या टेन्शनमधून ते मुक्त झाले आहेत. संपूर्ण पाच एकरांत एकूण १३०० झाडांची लागवड केली असून, यामध्ये दोन एकरांत २५ आंबे, २५ लिंबू, २५ चिक्कू, १० पेरू, १०० नारळ, ५ आवळ्याची झाडे असून, यातून दरवर्षी २ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. डाळिंबातून ७ लाखांचे असे एकूण ९ लाखांपर्यंत या क्षेत्रातून आम्ही उत्पन्न घेतले आहे. तरी तरुण शेतकºयांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केल्यास मोठे उत्पन्न मिळेल, असे प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी सांगितले.