ऑक्सिजनअभावी सात रुग्णांचा मृत्यू?; इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:17 AM2021-04-29T06:17:47+5:302021-04-29T06:20:06+5:30
नगरमधील घटना : इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा दावा
अहमदनगर : येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तत्काळ संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने नव्हे तर कोरोना आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे झाल्याची सारवासारव केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने संबंधित खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यामुळे नव्हे तर इतर आजारांमुळे झाल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस यंत्रणेने या रुग्णालयाभोवती बंदोबस्त तैनात केला आहे.
नगर जिल्ह्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई आहे. जिल्ह्यासाठी रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी २० तर मंगळवारी
५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. तिथे रांगा असल्याने
खासगी रिफिलिंग प्लांटवर दहा ते बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. हीच परिस्थिती एका खासगी रुग्णालयातील रुग्णांवर बेतली
व त्यातच रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
एकाच वेळी नव्हेतर, २४ तासांत झाले मृत्यू
त्या हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू हा एकाच वेळी नव्हे तर २४ तासांमध्ये झालेला आहे. संबंधित हॉस्पिटलला ऑक्सिजनचा आवश्यक तेवढा साठा उपलब्ध होता. गुंतागुंतीच्या आजारामुळे येथील रुग्ण आधीच गंभीर होते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले