मांडूळ तस्करी करणारे सात जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:40 PM2018-10-03T15:40:07+5:302018-10-03T15:40:16+5:30
सर्पजातीतील दुर्मिळ असलेले मांडूळ तस्करी करणाऱ्या सात जणांना कोतवाली पोलिसांनी नगर व घोडेगाव येथून अटक केली.
अहमदनगर : सर्पजातीतील दुर्मिळ असलेले मांडूळ तस्करी करणाऱ्या सात जणांना कोतवाली पोलिसांनी नगर व घोडेगाव येथून अटक केली. कवठा (ता. श्रीगोंदा) येथे उसाच्या शेतात सापडलेले हे मांडुळ मुंबई येथे विकण्यात येणार होते.
विजय अशोक वाघ (वय २० रा. कायगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद), विष्णू काशिनाथ जाधव (वय ३० रा. तांदूळवाडी ता. गंगापूर), राधाकिसन बाजीराव काळे (रा. नांदर ता. पैठण), गणेश अशोक माळी, ज्ञानेश्वर अभिमान गोरे, छबू बबन गायकवाड व प्रकाश ताराचंद माळी (सर्व रा. नांदर ता. पैठण जि. औरंगाबाद) असे ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन फूट लांबीचे एक मांडूळ व तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप गवारे यांना सोमवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात संशयास्पद मोटारसायकलवर पांढरी पिशवी घेऊन जाताना दोन व्यक्ती दिसले. गवारे यांनी ही माहिती ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना दिली. गोकावे यांनी पथकासह या दोघांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी त्यांची नावे विजय वाघ व विष्णू जाधव अशी सांगितली़. या दोघांकडे असलेल्या पिशवीत मांडूळ आढळून आले. हे दोघे जण घोडेगाव येथे (ता. नेवासा) थांबलेल्या पाच जणांकडे हे मांडूळ देणार होते. त्यानंतर सर्व जण मिळून मुंबई येथे या मांडूळाची विक्री करणार होते. पोलीस पथकाने घोडेगाव येथे जाऊन त्या पाच जणांना ताब्यात घेतले. हा गुन्हा वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत येत असल्याने पोलिसांनी त्यांना वनविभागाच्या ताब्यात दिले. या प्रकरणी वनरक्षक बी. व्ही. शिंदे हे पुढील तपास करत आहेत. गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेश गवळी, नयन पाटील, पोलीस नाईक संदीप गवारे, राजू जाधव, रवींद्र घुंगासे यांच्या पथकाने केली.