गणेशोत्सवावर आचारसंहितेची छाया
By Admin | Published: August 9, 2014 11:16 PM2014-08-09T23:16:17+5:302014-08-09T23:33:13+5:30
गणेशोत्सवावर आचारसंहितेची छाया
अहमदनगर : यंदाच्या गणेशोत्सवावर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची छाया दाटून आली आहे. स्वातंत्र्यदिनानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तर थोडा ताण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र आचारसंहिता लागली नाही, तर पोलिसांवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे पोलिसांनी गणेश मंडळे आणि त्याला जोडणाऱ्या राजकीय पक्षांची धास्ती घेतली आहे. डीजे न लावता उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी मंडळांना साकडे घातले आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार डीजेचालकांनी ध्वनिपातळीची मर्यादा ओलांडल्यास जागेवरच कारवाई करण्यात येणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव २९ आॅगस्टपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त उत्सवाच्या तयारीसाठी मानाच्या गणेश मंडळांच्या प्रमुखांची पोलीस प्रशासनाने कोतवाली पोलीस ठाण्यात बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, लक्ष्मण काळे उपस्थित होते. गणेश मंडळांनी डीजे लावू नये. डीजेला कोणतीही परवानगी नाही. डीजेमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती पोलिसांनी दिली. तसेच उत्सवाला गालबोट लागणार नाही, यासाठी काही नियम-अटी पोलिसांनी घालून दिल्या. या बैठकीला गणेश मंडळांचे प्रमुख अशोक कानडे (विशाल गणपती मंदिर विश्वस्त), दत्ता कावरे, मनेष साठे, कैलास गिरवले,अविनाश घुले, शिवाजी कदम, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते. पोलीस नाईक विकास खंडागळे, अजय गव्हाणे यांनी बैठकीसाठी परिश्रम घेतले.
(प्रतिनिधी)