शिवमंदिरावर कोरोनाची छाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:36 PM2020-07-27T12:36:05+5:302020-07-27T12:36:27+5:30
ढवळगाव : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रावणातील नागपंचमी सणाला अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत असते. परंतु कोरोनाने थैमान घातल्यामुळे यंदा सप्ताहाच्या कार्यक्रमावरती गडद छाया पडली आहे. आषाढघन बरसून जातो आणि सुरुवात होते श्रावणातील सरींना.
ढवळगाव : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रावणातील नागपंचमी सणाला अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत असते. परंतु कोरोनाने थैमान घातल्यामुळे यंदा सप्ताहाच्या कार्यक्रमावरती गडद छाया पडली आहे.
आषाढघन बरसून जातो आणि सुरुवात होते श्रावणातील सरींना.
श्रावणातील आल्हाददायक गारवा, वाºयावर डोलणारे हिरवे शिवार, खळखळणारे निर्झर, आकाशात मनमुराद विहार करणारे पाखरांचे थवे, हिरवाईने नटलेले डोंगर, कोवळे, चमकणारे ऊन, ऊन-सावलीचा खेळ, अवघा आसमंत आपल्या सुगंधाने दरवळविणारे आणि खुशीत डोलणारे फुलांचे ताटवे, वृक्षवेलींवरील तरारलेली पाने, नववधूगत हिरवा शालू नेसून नटलेली ही वसुंधरा निसगार्चं हे लोभस रूप, हा अनमोल नजराणा पाहून मन हरखून जाते.
निसर्ग सौंदर्याने नटलेला, पशुपक्षांच्या कूजनाने
गजबजलेला, वेगवेगळ्या फुलांनी दरवळलेला
प्रत्येकाच्या मनात चैतन्याने, उत्साहाने सळसळणारा
मनाच्या गाभार्यात सण, उत्सव, संस्कृतीचे विविधरंगी अध्यात्मसुगंधात्मक सात्त्विक तोरण झळकावणारा असा हा श्रावण. प्रत्येक वर्षी येणारा, आपल्याला वाट पाहायला लावणारा, याही वर्षी आला पण एक वेगळेच करोनाचे संकट घेऊन. आनंदाला भरती यावे असेच सण-उत्सव आणि भक्तिरसात न्हाऊन निघणारे 'अखंड हरिनाम सप्ताह' अशा प्रकारे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्वणी श्रावण महिन्यात पहायला मिळते पण यावर्षी सर्व काही थांबलेलं आहे कोरोनामुळे.
सामाजिक मेळावे, धार्मिक कार्यक्रम किर्तन, भजन, हरिपाठ सामुदायिक एकत्रित येऊन करावयाचे कार्यक्रम असे सर्वकाही करोनामुळे ठप्प झालेलं आहे. आत्ताच्या घडीला जी माणसं जीवन जगत आहेत त्यांनी या अगोदर असे भयंकर करोनाचे संकट कधीच पाहिलेले नव्हते.
अनेक वर्षांची परंपरा थांबलेली आहे मंदिरे सुनी आहेत.जिथे हजारोंच्या उपस्थितीत कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे तिथे आज सर्व काही सुनं सुनं दिसत आहे. कसला उत्साह नाही की चैतन्य नाही. प्रत्येकाच्या चेहºयावर एक प्रकारची उदासीनता अन् भीती पाहायला मिळत आहे. यंदा करोनाच्या सावटाखाली अवघं जग आहे. पहिल्यासारखं केव्हा एकदा सुरळीत होईल आणि पुर्वीसारखे मुक्त जीवन जगायला मिळेल याचीच आपण सर्वजण वाट पाहत आहोत.
नक्कीच असा दिवस लवकरात लवकर उगवेल आणि आपल्याला असणारी करोनाची धास्ती निघून जाईल आणि पूर्वीसारखेच जीवन सुरळीत सुरू होईल.