शेक्सपिअरच्या देशातील कवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:52 AM2018-12-23T11:52:32+5:302018-12-23T11:52:42+5:30
शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे.
अहमदनगर : ‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे. या पुस्तकात त्यांनी आद्यकवी जेफ्री चॉसरपासून एलिझाबेदन आणि व्हिक्टोरियन कालखंडातील कवी ते अलीकडच्या काळातील डिलन थॉमसपर्यंत एकवीस कवींच्या आयुष्याचा सखोल मागोवा घेतला आहे. हे कवी व्यक्तिगत आयुष्य कसे जगले, हे या पुस्तकातून रंजकपणे सामोरे येते.
एखाद्या साहित्यिकाचे साहित्य समजून घ्यायचे असेल तर जीवनानुभवातून त्याचं घडत गेलेलं व्यक्तिमत्त्व त्याच्या साहित्यात कशा प्रकारे प्रतिबिंबित झालं आहे याचा उलगडा होऊ शकतो. इंग्रजी साहित्यातील आद्यकवी जेफ्री चॉसरपासून सुरुवात केल्यामुळे या ग्रंथाचा आवाका मोठा झाला आहे. हे सगळे कवी इंग्रजी साहित्यातील अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वं आहेत. त्यांनी फक्त कविताच केल्या नाहीत तर साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये उत्तुंग भराऱ्या मारल्या आहेत. मुळात ज्याच्या नावातून या पुस्तकाने आकार घेतला आहे, तो शेक्सपिअर हा जसा जगज्जेता नाटककार म्हणून सगळ्यांना माहीत आहे; तसा कवी म्हणून तितकासा परिचित नाही. लेखकाने शेक्सपिअरच्या काव्याचा
परिचय करून देताना त्याचा संघर्षमय जीवनप्रवास अत्यंत अप्रतिमरीत्या रेखाटला आहे.
प्रत्येक कवी वाचताना लेखकाने त्या कवीवर कुणाचा प्रभाव होता, त्याचे मित्र कोण होते आणि त्यांचा त्याच्यावर काय परिणाम झाला हेदेखील सांगितले आहे, त्यामुळे हे पुस्तक रंजक झाले आहे.
प्रत्येक कवीचा जन्मापासून ते वेस्टमिनिस्टर अॅबेच्या दफनभूमीपर्यंतचा प्रवास हा वाचकाचे हृदय हेलावणारा आहे. सर वॉल्टर रॅलेला मृत्युदंडाची शिक्षा देऊन त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं. सर फिलीप सिडनी रणभूमीवर गोळी लागून जखमी होऊन जगाचा निरोप घेतो.
शेक्सपिअर वाढदिवसाच्या दिवशीच शांतपणे जगाचा निरोप घेताना मनाला चटका लावून जातो. बेन जॉन्सन आणि कोलरिज एकाकीपणात हे जग सोडतात. शेलेचा मृत्यू प्रवासादरम्यान नौका वादळात उलटून बुडून झाला. लॉर्ड बायरन ब्लडलेटिंगमुळे आजारी पडला आणि त्यानंतर संसर्ग होऊन मरण पावला. जॉन कीट्सचा ऐन पंचविशीत क्षयाने झुरत झुरत एकाकीपणे रोममध्ये अंत
झाला.
या सगळ्या कवीचं आयुष्य समजावून सांगताना लेखकाने पुस्तकात मराठी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी काव्यातील असंख्य अवतरणांची उधळण केली आहे. या सगळ्या कवीचं वादळी आयुष्य वाचताना वाचक अवाक् झाल्याशिवाय राहत नाही. बालपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची वैयक्तिक आयुष्यं, त्यांच्या मनातील भीती व आनंदाचे क्षण या साºयांचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात कसे प्रतिबिंबित झालेले आहे, याचा अचूक वेध लेखकाने घेतला आहे.
कवींचे वैयक्तिक जीवन व त्यांची प्रेमप्रकरणे वाचताना तर आपण अक्षरश: चक्रावून
जातो.
सुरुवातीला हे पुस्तक हातात घेतल्यावर असं वाटतं, की हे इंग्रजी कवितेवरील एखादं क्लिष्ट पुस्तक असेल. परंतु लेखकाने या कवींच्या जीवनकथा इतक्या रंजकपणे सांगितल्या आहेत, की हे पुस्तक वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतं.
हे पुस्तक वाचताना अंगावर नक्कीच रोमांच उभे राहतात आणि आपण एक नव्या दृष्टीने आपल्या आजूबाजूचा भवताल न्याहाळू लागतो. त्यामुळे हे पुस्तक संग्रहणीय झाले आहे.
गणेश खंडाळे