शालिनी विखे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा : बाबा ओहोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:57 PM2019-06-21T12:57:48+5:302019-06-21T13:00:33+5:30
विखे परिवार आता भाजपवासी झाला आहे. विखे परिवारातील शालिनी राधाकृष्ण विखे यांनी अद्याप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही.
संगमनेर : विखे परिवार आता भाजपवासी झाला आहे. विखे परिवारातील शालिनी राधाकृष्ण विखे यांनी अद्याप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या शालिनी विखे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींच्या आदेशाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांना देण्यात आले. त्यावेळी अनेक निष्ठावंत काँग्रेस सदस्यांना डावलून ही जबाबदारी विखे यांना देण्यात आली. मात्र, विखे परिवार हा आता भाजपवासी झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे या देखील राधाकृष्ण विखे यांच्यासोबत होत्या. तशी छायाचित्रे देखील प्रसिद्ध झाली आहेत. याचा अर्थ मुलगा व पती यांच्या समवेत त्या देखील भाजपवासी झाल्या आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत शालिनी विखे यांनी राहाता तालुक्यातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यात त्या विजयी झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या. परंतु, आता विखे परिवाराने काँग्रेस पक्ष सोडला असल्यान पक्षाने दिलेल्या पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ओहोळ यांनी केली आहे.