शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त महिलेचा विनयभंग-मारहाण : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:16 PM2018-08-01T18:16:43+5:302018-08-01T18:16:51+5:30
शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह ८ ते १० जणांवर शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा : शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह ८ ते १० जणांवर शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैभव सुखदेव शेटे, सोमनाथ बापूसाहेब शेटे, एकनाथ भाऊसाहेब शेटे, नवनाथ भास्कर शेटे, मयूर जालिंदर देठे, बलभीम भाऊराव दाणे (सर्व रा.शनी शिंगणापुर ता.नेवासा) यांच्यासह ८ ते १० जणांच्या विरोधात विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिला विश्वस्तानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि ३१ जुलै २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शनी मंदिर येथे प्रशासकीय कार्यालयात मिटिंग हॉलमध्ये मिटिंगच्या कामासाठी पती समवेत गेले होते. मागील महिन्यात झालेल्या उपोषण संदर्भातील कागदपत्रांच्या नकला रजिस्टर झेरॉक्स प्रति उपोषण कर्त्यांना देण्याकरिता मिटिंग चालू होती. त्यावेळी मयूर देठे हा मोबाइलवर मिटिंगची शूटिंग काढत होता. त्यावेळी सर्व विश्वस्त उपस्थित होते. दरम्यान त्याला मी ‘तू शूटिंग काढू नको’ असे म्हटले असता याचा त्याला व इतर जमलेल्या काही लोकांना राग आला. त्यावेळी मयूर जालिंदर देठे याने त्याचे हातातील मोबाईलचा कॅमेरा बंद केला असता वैभव शेटेसह ८ ते १० जणांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल. मला लाथा बुक्कयांनी मारहाण केली. माझ्या हातावर मारल्याने हातातील बांगडीच्या काचा फुटून त्या हातात घुसल्या आहे. माझ्या पतीला ही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी या लोकांनी दिली. या झटापटीमध्ये माझे गळ्यातील दागिने तुटून गहाळ झाले आहेत, असे महिला विश्वस्ताने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.