शनी शिंगणापूर देवस्थान शासनाच्या ताब्यात जाणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:48 PM2018-06-10T18:48:16+5:302018-06-10T18:50:05+5:30
शनी शिंगणापूर देवस्थान शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शासन ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड शासनामार्फतच होणार असल्याचे समजले. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे .
नेवासा : शनी शिंगणापूर देवस्थान शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शासन ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड शासनामार्फतच होणार असल्याचे समजले. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलतांना शिंगणापूर देवस्थान ताब्यात घेण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार असल्याचे सांगितले. शिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेतल्यानंतर कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकारकडून होणार आहे. त्यासाठी सरकार देवस्थानची घटना बदलू शकते. शिंगणापूरचा जो मूळ रहिवासी आहे तीच व्यक्ती विश्वस्त होऊ शकते, परंतु नवीन नियमानुसार राज्यातील कोणीही शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त होऊ शकतो.
शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी शनी शिंगणापूर गावातील सुमारे १०४ ग्रामस्थांनी धमार्दाय आयुक्तांकडे अर्ज केले होते. त्या मुलाखती होऊन ११ ग्रामस्थांना विश्वस्त होण्याची संधी मिळाली. १९६३ सालापासून शिंगणापूरची परंपरा या निर्णयाने धोक्यात येणार आहे. शासनाने हा निर्णय घेतल्यास गावातून विरोध होण्याची शक्यता आहे .
शनी शिंगणापूर गावात अगदी राजकीय टोकाचा संघर्ष असला तरी या निर्णयाविरोधात ग्रामस्थ एकत्र येण्याची चिन्हे आहेत. कारण गावातीलच व्यक्तीला विश्वस्त होता येते अशी देवस्थानची घटना आहे. सरकारला देवस्थान ताब्यात घेण्याअगोदर विधी व न्याय खात्याकडून देवस्थानची घटना बदलून कॅबिनेटमध्ये मंजुरी घ्यावी लागेल .
जगाच्या पाठीवर शनी शिंगणापूर हे आगळे वेगळे गाव असून गावातीलच विश्वस्त होतात ही ५५ वर्षांची परंपरा आहे. याला सरकारने छेद देऊ नये. असा निर्णय झाल्यास ग्रामस्थ विरोध करतील.
- बाळासाहेब बानकर, सरपंच, शनी शिंगणापूर
देवस्थान शनीभक्तांच्या सुविधेसाठी कटीबद्ध असून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे सरकारच्या या निर्णयाची आम्हाला काही कल्पना नाही परंतु सरकारने गावाच्या परंपरेचा विचार करावा
-अप्पासाहेब शेटे, विश्वस्त, शनेश्वर देवस्थान