शिर्डीतील उद्योगपती शांतीलालजी गंगवाल यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:36 PM2020-07-19T12:36:38+5:302020-07-19T12:37:30+5:30
शिर्डी येथील प्रतिथयश उद्योगपती शांतीलालजी खुशालचंदजी गंगवाल यांचे नगर येथे कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते.
शिर्डी : येथील प्रतिथयश उद्योगपती शांतीलालजी खुशालचंदजी गंगवाल यांचे नगर येथे कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते. साईभक्त असलेले संत दासगणु महाराजांची सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते.
गेल्या आठ दिवसांपूर्वी शांतीलालजी स्रानगृहात पडले होते. त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाल्याने नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (१८ जुलै) मध्यरात्री नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तरुणपणात शांतीलालजी बैलगाडी चालवत. साईबाबांच्या समाधी मंदिरापासून अगदी वीस फुटाच्या अंतरावर पूर्वी त्यांचे घर होते. त्यामुळे ते संत दासगणुंना शिर्डीत येण्यासाठी गाडीसेवा पुरवत असत व अन्य सेवाही करीत. संत दासगणु महाराज अखेरचे जेव्हा शिर्डीतून गेले त्या खेपेनंतर शांतीलालजी यांनी गाडी धंदा सोडून दुसरा धंदा सुरू केला. त्यानंतर कठोर परिश्रम, सचोटी व मधूर वाणी या त्रिसुत्रीवर शांतीलालजी शिर्डीतील प्रमुख उद्योजक बनले. येथील उद्योजक अशोक गंगवाल व किशोर गंगवाल यांचे ते वडील होत.