शरद पवार बनले 'डॉक्टर', देशातील शेतकऱ्यांना समर्पित केला सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:03 PM2021-10-28T16:03:50+5:302021-10-28T16:05:18+5:30
कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो.
अहमदनगर - माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. त्या समारंभात डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने शरद पवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यामुळे, त्यांच्या नावापुढे आता डॉक्टर ही पदवी लागली आहे. पवार यांनी बहुमानासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आभार मानले आहेत.
कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. तसेच, देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं, त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले. शरद पवार यांचे कृषी क्षेत्रासाठी मोठं योगदान आहे, बारामती अॅग्रो उभारण्यातही त्यांना मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी सातत्याने नाविण्यापूर्व प्रयोग केले आहेत.
शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रासाठी योगदानाची दखल घेऊनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे, त्यामुळेच शरद पवारांना शेतकऱ्यांचा नेता असेही संबोधले जाते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शेती संदर्भातील विविध समित्या आणि खात्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. विशेष म्हणजे देशाचे कृषीमंत्री म्हणूनही त्यांनी 10 वर्षे काम केलंय. देशातील शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी त्यांच्याच काळात मिळाली होती. शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहास होता, असेही त्यांनी यापूर्वी एका भाषणात सांगतिले होते.