Exclusive: अण्णा हजारेही शरद पवारांबद्दल भरभरून बोलले, भाजपाचे कान खेचले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:18 PM2019-10-26T12:18:11+5:302019-10-26T16:56:45+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचे कौतुक केले आहे. पक्ष बदलणा-यांना हजारे यांनी उड्या मारणा-या माकडांची उपमा दिली आहे. 

Sharad Pawar campaigning for Anna too; Learn about the exodus from the exodus | Exclusive: अण्णा हजारेही शरद पवारांबद्दल भरभरून बोलले, भाजपाचे कान खेचले!

Exclusive: अण्णा हजारेही शरद पवारांबद्दल भरभरून बोलले, भाजपाचे कान खेचले!

विशेष मुलाखत / सुधीर लंके 
अहमदनगर: शरद पवार यांचे व माझे वैचारिक मतभेद आहेत.  मात्र, असे असले तरी या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जे काम केले ते आपणालाही भावले आहे. ध्येयाने प्रेरित होऊन झपाटल्यासारखा त्यांनी भर पावसात प्रचार करत पक्षाला जीवदान दिले व विरोध जीवंत ठेवला, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचे कौतुक केले आहे. पक्ष बदलणा-यांना हजारे यांनी उड्या मारणा-या माकडांची उपमा दिली आहे. 
विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हजारे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात जो निकाल हाती आला तो सदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक लोकांनी पक्षांतर करुन माकडउड्या मारल्या. इकडून तिकडे गेले. वैयक्तिक अडचणीत आले किंवा एखादा पक्ष अडचणीत आहे म्हणून त्याला सोडून सोयीच्या पक्षात जायचे हे योग्य नाही. हे सर्व स्वार्थी राजकारण आहे. मात्र, मतदारांनी अशा माकडउड्या मारणाºयांपैकी १७ उमेदवारांना घरी बसविले आहे. माझ्यादृष्टीने या निवडणुकीतील ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. लोकशाहीच्या वाढीसाठी मतदारांनी असे करणे गरजेचे होते. 
शरद पवारांच्या प्रचारनितीची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. हजारे व पवार यांच्यात अनेकदा मतभेद झालेले आहेत. दोघांनीही एकमेकांवर जाहीर टीकाटिपण्णी केलेली आहे. मात्र, ‘लोकमत’च्या या मुलाखतीत त्यांनी पवारांच्या प्रचारतंत्राचे कौतुक केले. ते म्हणाले, पवार  व माझ्यात मतभेद आहेत. अर्थात हे मतभेद समाजाच्या हितासाठीच आहेत. मी त्यांच्या मंत्र्यांबाबतही अनेकदा तक्रार केली. मात्र, पवारांनी यावेळी ज्या पद्धतीने प्रचार केला तो तरुणांनाही लाजविणारा आहे. आपला पक्ष रसातळाला चालला आहे हे पाहून या वयात ते राज्यभर फिरले. पक्षाला त्यांनी अडचणीतून बाहेर काढले. त्यांच्या प्रचाराचा त्यांचा मित्र असलेल्या कॉंग्रेसलाही फायदा झाला. अन्यथा हे पक्ष आता संपतील की काय असा धोका निर्माण झाला होता. या पक्षांना भविष्य दिसत नव्हते. विरोधामुळे लोकशाही जीवंत राहते. त्यामुळे सत्ताधा-यांना विरोध हा असायलाच हवा. पवारांनी विरोध कायम ठेऊन जनतेला जागे करण्याचे काम केले आहे. ध्येयाने पछाडलेले असे राज्यकर्तेच लोकशाही मजबूत करु शकतात, अशा भावना त्यांनी बोलून दाखविल्या. चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे अशी पुस्तीही त्यांनी आपल्या या वक्तव्याला जोडली. निवडणुकीचा एकूण जो प्रचार झाला तो बरोबर नव्हता. त्यात वैयक्तिक हेव्यादाव्यांचीच चर्चा अधिक होती. प्रचारात हे घडणे अपेक्षित नाही. विकासावरती चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले. 
सत्ताधा-यांना अहं नडला
भाजप-सेनेच्या जागा का घटल्या असाव्यात या प्रश्नावर भाष्य करताना हजारे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत असले तरी त्यांचे मंत्री, कार्यकर्ते यांचा जनतेशी संपर्क तुटला होता. त्यांच्यात अहं निर्माण झाला होता. आम्हाला कोणी हरवू शकत नाही. आमच्यासारखे आम्हीच, अशी त्यांची भावना झाली होती. विरोधी पक्ष रसातळाला गेला आहे, असा भास निर्माण करण्यात आला होता. या सर्व गोष्टींमुळे भाजप-सेनेच्या जागा घटल्या. आता निकालातून त्यांना धडा मिळेल. यापुढे ते जपून वागतील. मतदार हा राजा आहे. तो जागा झाला तर काय करतो हे सत्ताधा-यांनाही समजेल. शरद पवारांनी परिवर्तन आणल्यामुळे राज्यकर्ते आता जागे होतील.  
जाहिरनामे न पाळल्यास पदे बरखास्त करा
नेत्यांची पक्षांतरे थांबविण्यासाठी बॅलेटवर ‘नोटा’ ऐवजी ‘वरील एकही उमेदवार पसंत नाही’ असे लिहायला हवे. त्यासाठी स्वतंत्र चिन्ह हवे. उमेदवारांपेक्षा या चिन्हाला जास्त मते पडली तर फेरनिवडणूक घ्यायला हवी. ज्या उमेदवारांना नाकारले. त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधीच द्यायला नको. यातून गुंड, व्याभिचारी लोकांंना पक्ष तिकिटच देणार नाहीत. तसेच उमेदवार व पक्ष जे जाहिरनामे काढतात ते न पाळल्यास त्यांना बरखास्त करण्याची तरतूद हवी. म्हणजे उगाचच कोणतीही आश्वासने देऊन दिशाभूल केली जाणार नाही, असेही हजारे म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar campaigning for Anna too; Learn about the exodus from the exodus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.